मुरूड : प्रतिनिधी
लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष पसरल्याने मुरूडचा संपूर्ण समुद्रकिनारा पुन्हा एकदा विद्रुप झाला आहे. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगरदांडा-दिघी जेटीजवळ येणार्या मोठ्या जहाजांमधून होणारी तेल गळती व बंदरात तेल लावून ठेवलेल्या बोटींमुळे समुद्राच्या पाण्यात तेल पसरते. हा तेलाचा तवंग लाटांसोबत किनार्यावर येतो. काही वेळा हा तवंग वाळूच्या संपर्कात आल्याने त्यांच्या डांबरसदृश गोळ्या तयार होतात. मुरूड समुद्रकिनारी केवळ 15 दिवसांच्या अंतराने तेल तवंग आणि डांबरसदृश गोळ्या पसरल्या असून, त्यामुळे हा समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे. पाय टाकावा तिथे ऑइल असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा आहे. त्या मुळे मासेमारीसोबत पर्यटनावरही परिणाम झाला आहे. महिन्यातून दोनवेळा समुद्रकिनारी ऑइल आले तरी शासकीय यंत्रणा मात्र झोपेत आहेत. ऑइल वारंवार का येत आहे, याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड व मत्स्य विभाग कोणतीही चौकशी करीत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सध्या मुरूड नगर परिषदेकडून समुद्रकिनार्यावर पसरलेल्या ऑइलवर जेसीबीच्या सहाय्याने समुद्राची वाळू टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनाराही विद्रूप
श्रीवर्धन : काल सायंकाळपासून श्रीवर्धन समुद्रकिनारी ऑइल युक्त पाणी येत आहे. त्यामुळे हा किनारा पूर्णपणे विद्रुप झाला आहे. नागरिक किंवा पर्यटक पाण्यामधून या धूपप्रतिबंधक बंधार्यावर आल्यानंतर त्यांच्या पायाला लागलेल्या ऑईलचे ठसे उमटलेले दिसतात. समुद्राच्या पोहायला गेल्यानंतर ऑईलयुक्त पाण्यामुळे अंगाला चिकटपणा येत असून, अंगाला खाज सुटण्याचा प्रकारदेखील घडत आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने याबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.