खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात डोंगर पोखरण्यासाठी बुधवारी (दि. 4) दुपारी करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटामुळे महाकाय दगड, गोटे शेजारी असणार्या ढेकू (ता. खालापूर) गावात जाऊन पडले. त्यामध्ये चार घरांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नव्या चौपदरी मिक्सिंग लिंकचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी डोंगर पोखरण्याचे काम जोमाने सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भूसुरुंग स्फोट घडवून आणले जात आहेत. या मार्गाचे काम करणार्या अफकॉन कंपनीने बुधवारी (दि. 4) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केले. त्यामुळे उडालेले महाकाय दगड गोटे द्रुतगती महामार्गाशेजारी असणार्या ढेकू गावात जावून पडले. त्यामध्ये चार घरांचे नुकसान झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या चिंतामण चव्हाण, सुरेश पाटील यांच्यासह 50 ते 60 ग्रामस्थांनी मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता भुसुंरुग करण्यार्या अफकॉन कंपनीच्या अधिकार्यांना घेराव घालीत जाब विचारला. या वेळी त्यांनी नुकसान झालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही केली. खोपोली पोलीस, बोरघाट पोलिसांनी ढेकू गावातील रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगतीवर नवीन मिक्सिंग लिंकचे काम सुरू असल्याने दिवसातून दोन वेळा भुसुरुंग केले जात असून त्या वेळी किमान अर्धा तास वाहतूक रोखली जात असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
अफकॉन कंपनी, खोपोली पोलीस आणि ढेकू ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक गुरुवारी दुपारी 12 वाजता खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली असून या बैठकीत झालेल्या नुकसानीची भरपाई व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना व चर्चा करण्यात येणार आहे.
-सुरज पाटील, ग्रामस्थ, ढेकू ता. खालापूर
सुरूंग स्फोटामुळे ढेकू गावातील घरांचे नुकसान झाले असेल तर त्याची माहिती घेऊन संबंधीतांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
-आयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर