कर्जत : बातमीदार
तालुक्यातील दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीमधील टाकाचीवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु आहे. ग्रामपंचायतीकडून येणारी जलवाहिनी वारंवार तोडून टाकण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांना सव्वा किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे आणावे लागत आहेत.
दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीतील भडवळ टाकाचीवाडीमध्ये 85 घरांची वस्ती असून तेथे तीन विहिरी आहेत, त्यापैकी एका विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तर अन्य दोन विहिरी जानेवारी महिन्यात कोरड्या पडतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाणी विहिरीत सोडून ग्रामस्थांची तहान भागविली जाते. मात्र भडवळ गावातून येणारी जलवाहिनी आणि तेथील व्हॉल्व्हदेखील वारंवार तोडण्यात येत असल्याने टाकाचीवाडीमधील विहिरीपर्यंत पाणी पोहचत नाही. ज्या भागात जलविहिनी तोडतात त्या ठिकाणी आदिवासी ग्रामस्थ थांबून राहतात. त्यावेळी नळाद्वारे विहिरीत पाणी पोहचते, पण ते गढूळ येते. त्यात दोन्ही विहिरीत चार, आठ दिवसांनी कधीतरी पाणी येत असल्याने आदिवासी ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी महिन्यापासून सुरु असलेली भडवळ टाकाचीवाडी ग्रामस्थांची धावपळ आता कडक उन्हातदेखील सुरु आहे. अतिवृष्टीमध्ये तुटलेल्या विहिरीमध्ये आदिवासी लोकांनी डवरे खोदले असून, त्या विहिरीत उतरून आदिवासी ग्रामस्थ घरात वापरण्यासाठी पाणी गोळा करून आणतात. तर तेथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी सव्वा किलोमीटर अंतरावरील एक फार्महाऊस गाठावे लागते. या फार्महाऊसमधील बोअरवेलचे पाणी नंबर लावून घरी आणावे लागते.
कडक उन्हात डांबरी रस्त्यावर चटके सहन करीत आदिवासी महिलांना डोक्यावर हांडे आणावे लागत असल्याने सर्व ग्रामस्थांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. भडवळ टाकाचीवाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना अस्तित्वात आणण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.