Breaking News

खोपोलीजवळ केमिकल कंपनीत स्फोट; दोन ठार, आठ जण जखमी

खालापूर : प्रतिनिधी

खोपोलीजवळील ढेकू औद्योगिक क्षेत्रातील साजगाव येथील जेसनोवा फार्मसिटिकल अ‍ॅण्ड स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीत गुरुवारी (दि. 5) मध्यरात्री स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील ढेकू आर्कोस औद्योगिक प्रिमायसेसमधील जेसनोवा कंपनीत मध्यरात्री 2.30च्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगही लागली. या स्फोटात शेजारील पेट्रोसोल कंपनीतील सुरक्षा रक्षकाची पत्नी वैष्णवी उर्फ सपना कृष्णा निवबाने (वय 32) आणि बेस्टो कंपनी सुरक्षा रक्षक अन्वर खान या दोघांचा मृत्यू झाला, तर कृष्णा प्रसाद नुबाने (40), कीर्ती कृष्णा नुबाने (15 महिने), आरती कृष्णा नुबाने (11), आशिष कृष्णा नुबाने (9), बिष्णोई कृष्णा नुबाने (35), गिरीष परदेशी गौडा (44), सागर रमेश कोंडीलकर (23) आणि नथू जानू पवार (30) जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की जेसनोवा कंपनीसह शेजारच्या इतर कंपन्यांचे शेड पडले. त्याचबरोबर तीन-चार किलोमीटरच्या परिसरात मोठा आवाज होऊन ढेकू, ताकई, देवन्हावे येथील अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच खोपोली नगर परिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगर परिषद आणि पेण नगर परिषद अशा एकूण 10 फायर ब्रिगेड दलांनी चार तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियत्रंण मिळविले. स्फोटाचा आवाज कानावर पडताच परिसरातील ग्रामस्थांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. या परिसरात अनेक कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, संबंधित खात्याचे अधिकारी या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दिवाळीच्या सणामध्ये 15 वर्षांपूर्वी खोपोलीतील अल्टा लॅबोरेटरीज व आयओसी केमिकल्स खोपोली या कारखान्यांमध्ये स्फोट होऊन किमान सात लोक ठार, तर 12 जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याच घटनेची आजही पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply