हैदराबाद : वृत्तसंस्था
प्रो-कबड्डी स्पर्धेच्या सातव्या सीझनमध्ये यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा पराभव करीत विजयी सुरुवात केली. मुंबईने तेलुगू टायटन्सचा 31-25ने पराभव केला; तर बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्सवर 34-32ने मात केली.
हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर प्रो-कबड्डीचा थरार रंगला. मुंबईसाठी कर्णधार फजल अत्राचलीने चार टॅकल, तर संदीप नरवालने चार टॅकल गुण मिळविले, तसेच अभिषेक सिंहने पहिल्या सुपर 10 गुणांची कमाई केली. मुंबाने सुरुवातीपासूनच तेलुगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईला टार्गेट करीत पहिल्या हाफमध्ये त्याला चार वेळा बाद केले. सामन्याच्या 12व्या मिनिटात मुंबईने टायटन्सला ऑलआऊट केले. यू-मुंबाकडून अभिषेक सिंहने उत्तम कामगिरी केली. या वेळी संदीप नरवाल आणि कर्णधार फजल अत्राचलीचा दबदबाही पाहायला मिळाला. दुसरीकडे बंगळुरू बुल्स आणि पाटणा पायरट्स यांच्यातही थरार पाहायला मिळाला. बंगळुरूने 34-32ने हा सामना खिशात घालत पाटणा पायरेट्सला धूळ चारली. बंगळुरूने पाटणाला ऑलआऊट करून विजयाचा मार्ग सोपा केला. प्रदीप नरवालने 10 अंक मिळवूनही पाटणाला विजय मिळविता आला नाही. पूर्वार्धात खरंतर पाटणाने 17-13 अशी आघाडी मिळवत वरचष्मा राखला होता. पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवाल (10 गुण), मोहम्मद मघसुदलू (9 गुण) यांच्या दमदार चढायांच्या जोरावर पाटणाच बाजी मारणार याची खात्री वाटत होती. अखेरची सात मिनिटे असताना मात्र 24-24 अशी बरोबरी झाली आणि तिथून पाटणाच्या हातून सामना निसटला. पाच मिनिटे असताना बंगळुरूने पाटणावर लोण चढविला आणि सामनाही पुढे जिंकला.