Breaking News

माणगावमध्ये भात भिजला; शेतकरी संकटात

माणगाव : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने संबंध दक्षिण रायगड उद्ध्वस्त केला असून माणगाव तालुकादेखील त्याला अपवाद राहिला नाही. शेतात रात्रंदिवस राबून कष्टाने पिकविलेला भात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडे महाराष्ट्र राज्य मार्केट फेडरेशनच्या शासकीय भात खरेदी केंद्रामध्ये शासनाची हमीभाव किंमत मिळविण्याकरिता दिलेला होता. हा भात वादळी पावसात भिजला आहे.

अनेक शेतकर्‍यांचा एकत्रित मिळून शासकीय पंचनाम्यानुसार 453 क्विंटल इतका प्रति क्विंटल 1815च्या दरानुसार तब्बल आठ लाख 22 हजार 155 रुपये किमतीचा भात पूर्णतः भिजून खराब झालेला आहे. त्यामुळे हे शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत.

याबाबत प्रकरणी खरेदी- विक्री संघाचे सभापती निलेश थोरे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा मार्केटिंग  अधिकारी (डीएओ) श्री. तारे यांना कळविले असून लवकरात लवकर मार्केट फेडरेशनतर्फे पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, शेतकर्‍यांना योग्य तो न्याय दिला जाईल.

भिजलेल्या कडधान्याला आले मोड

माणगाव : रायगडात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घर व अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.

वादळानंतर आठवड्याभरात नागरिकांनी घराची डागडुजी, अन्नधान्य स्वच्छता व झाडांच्या फांद्या छाटणीस सुरुवात केली आहे. अनेक घरांचे कौले, पत्रे उडाल्याने अगोटसाठी साठवून ठेवलेले भात तसेच धान्य भिजले आहे. त्यांना मोड आले असल्याने हा भात गायी गुरांसाठी उपयोगात आणला जात आहे.

वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत असून, शासनाकडून मिळणार्‍या मदतीची वादळग्रस्त आतुरतेने वाट पाहत आहेत. या कठीण काळात अनेक गावकरी एकमेकांच्या मदतीला धावून गेले. ही मंडळी सध्या घर परिसराची डागडुजी करण्यात व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे अन्नधान्य साफ करून घेतले जात आहे.

वादळाने कौले, पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात शिरले व आगोटसाठी साठवून ठेवलेले भात व धान्य भिजून गेले. या भिजलेल्या अन्नधान्याचे नुकसान होऊन त्यांना मोड आले आहेत. त्यामुळे ते गुरांना घालणे किंवा फेकून देण्याशिवाय पर्याय नाही, असे वादळग्रस्त शेतकरी काशिराम आडीत यांनी सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply