Friday , September 22 2023

नववर्षाचे स्वागत शेतघरांमध्ये!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नववर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी काही समूह, कुटुंबांनी सुरू केली आहे. शहराबाहेरची शेतघरे (फार्महाऊस) व बंगल्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे वसई, विरार, शहापूर, कर्जत, वांगणी, मुरबाड, पनवेल, उरण, अलिबाग, लोणावला, खंडाळा या जवळच्या ग्रामीण व थंड हवेच्या ठिकाणावरील शेतघर व बंगल्यांचे आरक्षण आत्तापासून सुरू झाले आहे. देशात कोरोना साथ रोगाचा पादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून टाळेंबदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पहिले सहा महिने नागरिकांनी स्वत: ला घरात कोंडून घेऊन काढले आहेत. टाळेबंदी शिथिलीकरणात लोकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली असून ऑक्टोबरनंतर हे प्रमाण वाढले आहे. दिवाळीत तर कोरोना साथरोग संपुष्टात आल्यासारखा नागरिकांचा संचार सुरू झाला आहे. त्यामुळे देशात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून हे प्रमाण डिसेंबर, जानेवारी महिन्यात अधिक वाढणार असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागांनी जाहीर केले आहे. असे असताना अनेक मित्र मंडळींनी तसेच कुटुंबांनी 2020 या कोरोनाग्रस्त वर्षाला निरोप व 2021 या नवीन वर्षाचे आपल्याच माणसांमध्ये स्वागत करण्याचे बेत आखले आहेत. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात असलेल्या वसई-विरारपासून ते अलिबागपर्यंतच्या शेतघरांना पसंती दिली जात आहे. यानंतर लोणावला, खंडाळ्यातील बंगल्यांना जास्त मागणी असून त्यांचे आरक्षण आत्तापासून केले जात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतील काही मोठे हॉटेल्स सामाजिक अंतर ठेवून या थर्टी फस्र्टच्या पाटर्याचे आयोजन करीत आहेत, मात्र त्याला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहलींचे आयोजन

मुंबईच्या आजुबाजूला असलेली शेतघरे ही खासगी असून त्यातील काही शेतघरे व्यावसायिक पातळीवर भाड्याने दिली जातात तर अनेक शेतघरमालक आपल्या मित्रमंडळी, आप्तेष्टासह या ठिकाणी सहली आयोजित करीत असल्याच दिसून येते.

यंदाचा थर्टी फर्स्ट हा आरोग्याची खात्री असलेल्या ओळखीच्या माणसांमध्ये साजरा करण्याचा आहे. त्यासाठी खासगी शेतघर निवडले असून लोणावळ्यात आरक्षण केले आहे.

-अर्जुन पवार

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply