केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपच्या जगदिश घरत यांचे निवेदन
रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई असून केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश घरत यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील नुकतेच अलिबाग तालुक्यात आले होते. त्या वेळी त्यांनी साळाव व येसदे येथे स्थानिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्यासह जगदिश घरत यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. अलिबाग तालुक्यातील थळ चाळमला येथील कोळीबांधव पिण्याच्या पाण्यापासून वंचीत आहेत, तसेच किहीम, रेवस, बोंडणी या भागातसुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्याबाबत संबधीतांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून उपाययोजना कराव्यात. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी ‘हर घर जल’ योजने अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.