Breaking News

जमिनीच्या पैशासाठी भाच्याने केला मामाचा खून

गुन्हात मामीदेखील सामिल; दोन वर्षांनी फुटली हत्येला वाचा

खोपोली : प्रतिनिधी

जमिनीचा पैसा हडपण्यासाठी भाच्याने मामाचा थंड डोक्याने काटा काढला. मात्र खालापूर पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे तब्बल दोन वर्षांनी या खुनाला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.  खालापूर पोलिसांना 1 जुलै 2020 रोजी जुन्या मुंबई-पुणे महा मार्गावर चौकनजीक अंदाजे पन्नास वर्षे वयाचा इसम मृतावस्थेत सापडला होता. मृतदेहाची कोणतीही ओळख पटेल असा पुरावा नसल्याने पोलिसांनी बेवारस नोंद करत मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला होता. परंतु मृतदेहाचा ताबा घेण्यास कोणीही पुढे न आल्याने पोलिसाने नियमानुसार अंत्यसंस्कार केले होते. या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच अनपेक्षितरित्या प्रकरणाचा खुलासा झाला. चौक येथे जुलै 2020 मध्ये सापडलेला मृतदेह हा सावकार तात्याबा घुले (सावरगाव, पुणे) या व्यक्तीचा असून सावकार याची जमीन हडपण्यासाठी त्याचा भाचा गणेश देवराम दरेकर (नारायणगाव) आणि सावकारची दुसरी पत्नी पल्लवी विठ्ठल चिलवंत ( रा. कोपरखैराणे, नवी मुंबई, सध्या रा. कळवा, जि.ठाणे) यांनी त्याचा खून केल्याचे वास्तव समोर आले. त्याहून धक्कादायक म्हणजे सावकार तात्याबा घुले याचा खोटा मयत दाखला देखील 2020 मध्ये पल्लवी आणि गणेश यांनी तयार करून घेतला होता. सावकार घुले हा पहिल्या पत्नीपासून विभक्त राहत होता. त्याचा भाचा गणेशाला मामाच्या नावे असलेल्या जमिनीची माहिती होती. ही जमीन विकून पैसा कमवायचा या हेतूने गणेशने प्लान तयार केला. यामध्ये त्याने पल्लवी हिलादेखील सामील करून घेतले. गणेशने सावकार याला कामानिमित्त कोपरखैरणे येथे आणले होते. त्याठिकाणी पल्लवी सोबत ओळख करून दिली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर गणेशने दोघांच लग्न लावून दिलं होतं. सावकार घुले याच्या नावे असलेली जमीन विक्री करून त्यामधून आलेले पैसे हडप करण्यासाठी गणेश आणि पल्लवी याने सावकार याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार 1 जुलै 2020 रोजी रिक्षातून जेवणासाठी तिघेजण बाहेर गेले. त्यावेळी गणेश याने पाण्यातून मामा सावकार याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तो बेशुद्ध झाला रिक्षाने तिघेजण जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने चौकनजीक आल्यानंतर पल्लवीने पती सावकारला रिक्षातून ढकलून दिले. त्यात सावकाराच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. गणेश आणि पल्लवीने राजपाल हॉस्पिटल नवी मुंबई येथील मृत्यूची खोटी कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारे नवीमुंबई महानगरपालिका विभाग कोपरखैराणे येथील मृत्यूचा खोटा दाखला बनविला होता.

अशी फुटली खुनाला वाचा : सावकार घुले यांच्या नावे असलेली जमीन कैलास घुले यांना विक्री करण्यात आली होती. कैलास घुले यांनी वारस नोंद होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची माहिती सावकार याचा भाऊ संपत तात्याबा घुले याला मिळाली. त्याने याबाबत अधिक चौकशी केली असता गणेश आणि पल्लवी याने सावकार याचा आजारपणात मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु सावकाराच्या भावाला संशय आल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. तपासात नवी मुंबई महानगरपालिका विभाग कोपरखैराणे येथून सावकार घुले यांचा मृत्यूचा दाखला दिल्याची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आल्याने संशय अधिक बळावत गेला. सावकार याचा मृत्यू दाखला खोटा असल्याचे समोर आले आणि गणेश, पल्लवीचे बिंग फुटले.

खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खालापूर पोलिसांनी पंचनाम्यात घेतलेले मयताचे फोटो आणि इतर वर्णन यावरून सावकारचा भाऊ संपत याला मृतदेहाची ओळख पटली आहे. सध्या गणेश आणि पल्लवी दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत.

-अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, खालापूर

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply