विरार : प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे प्रवासी साधने बंद असल्याने पायी प्रवास करून घरी जाणार्या सात मजुरांचा विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. वसईमध्ये कामानिमित्त असलेले सात मजूर आपल्या घरी म्हणजे गुजरातला जात होते, मात्र लॉकडाऊनमुळे गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. वसईच्या दिशेने परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले असून त्यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …