Breaking News

खालापूर शहरात रस्ता सुरक्षा उपाययोजना करा

दिलासा फाउंडेशनची आयआरबी कंपनीकडे मागणी

खोपोली : प्रतिनिधी

अवजड आणि अव्याहत वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचार्‍यांना धोकादायक वाटत असून, या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी  मागणी दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीकडे केली आहे.

बावीस वर्षापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी खालापूर शहरातून जोड रस्ता देण्यात आला. हाच रस्ता पुढे खालापूर टोल नाका मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडला जातो. शिवाय खोपोली-पेण, खोपोली-पाली, सावरोली-खारपाडा या राज्यमार्गांनादेखील खालापूर शहरातून जाणारा रस्ता जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. प्रवासी वाहनासोबत कारखान्यात जाणारे ट्रेलर, कंटेनर, बसेस अशा अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावर कायम असते. खालापूर शहरातून जाणार्‍या या मार्गालगत बस स्थानक, तहसील कार्यालय, रुग्णालय, न्यायालय, नगरपंचायत कार्यालय, शाळा यासह इतर शासकीय कार्यालयेदेखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी पादचार्‍यांची कायम वर्दळ असते. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून येणारी वाहने अनेकदा त्याच वेगाने टॉप गिअरने  शहरातील रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात घडले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या वाहनांची संख्या पाहता शहरातील रस्त्यावरून पादचार्‍यांना चाललेदेखील मुश्कील होणार आहे.

अशा वेळी वाहनांच्या वेगाला आवर घालणे गरजेचे आहे. खालापूत शहरातून जाणार्‍या अवजड वाहनांना वेग मर्यादेचे बंधन घालणे आवश्यक आहे. याशिवाय खालापुरातील रायगड बाजार, बस स्थानक, शहरात जाणारा रस्ता या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवणे आवश्यक आहेत. या मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती आयआरबी कंपनीकडे आहे.

खालापूर शहरातून जाणार्‍या रस्त्यावर पावसाळ्या अगोदर रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी रस्ता सुरक्षा उपाययोजना या विषयावर काम करणार्‍या दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीच्या अभियंत्यांकडे केली आहे.

खालापूर शहरातून शाळेपर्यंत ताशी वीस किमी वेगाने वाहने चालविण्याचे बंधन घालावे तसेच या रस्त्यावर  रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी पोलीस ठाण्यात पत्र देवून करणार आहोत.

-भाग्यश्री शिंदे, सदस्य, दिलासा फाउंडेशन-खालापूर

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply