विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा वाढवण्यासाठी चाचणीस आलेल्या रुग्णांच्या आकड्यासोबत त्यांच्या नातेवाईकांचेदेखील बनावट कोरोना रिपोर्ट बनवले गेल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. कहर म्हणजे 10 वर्षांपूर्वी ज्या इसमाचा मृत्यू झाला आहे अशा व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे दाखविण्यात आले आले आहे. या गंभीर प्रकाराची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दखल घेतली असून, ते नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेटून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहेत.
याबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार होत आहे असे मी आणि देवेंद्र फडणवीस म्हणत होतो. या सेंटर्समधील कर्मचार्यांचे आऊटसोर्सिंग, फॅन व बेड घेणे यामध्ये घोटाळा केला जातोय. याबाबत आम्ही अनेक गोष्टी राज्य सरकारच्या निदर्शनास आणल्या, पत्रव्यवहारदेखील केला, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आज जो प्रकार नवी मुंबईत उघडकीस आलाय त्यामुळे कोरोनाचे एक भयाण वास्तव आपल्यासमोर आले आहे.
प्रवीण दरेकर यांनी याबाबतची एक यादीही दाखवली ज्यामध्ये काही व्यक्ती गावाला गेलेल्या असताना त्यांच्या नावासमोर ’कोरोना निगेटिव्ह’ असा शेरा देण्यात आला आहे. दरेकरांनी आणखी काही उदाहरणे माध्यमांना दिली. याते मृत व्यक्तीचीही टेस्टिंग झाल्याचे ते म्हणाले. काही ठिकाणी एका व्यक्तीची त्यांच्या घरी टेस्ट झाल्यानंतर घरातील इतर सर्व निगेटिव्ह दाखवण्यात आलेत. अशा प्रकारची पाच हजार नागरिकांच्या नावांची यादी आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्याचे काम केले जातेय. हा आकडा फुगवल्याने या सर्व यंत्रणेवर जो खर्च होतो, तो मुळात खर्च न करता केवळ आकडा दाखवायचा आणि मोठा भ्रष्टाचार करायचा, असे दिसते. या प्रकरणी नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून चौकशीची मागणी करणार आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.