पूल वाहतुकीसाठी खुला; युवकांनी केले उदघाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येथील युवकांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल मार्गस्त झाला आहे.
पनवेल-मुंब्रा मार्गावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यात नावडे फाटा येथून तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे नावडे फाट्यावर नेहमी वाहतूककोंडी होते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी 70 कोटी रुपये खर्च करून एमएसआरडीसीने नावडे फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले. दोन वर्षांत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा संकल्प करण्यात आला होता, मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि नावडे ग्रामस्थांना गावातून बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे काही दिवस उड्डाणपुलाचे काम बंद होते. अखेर नावडे गावालगत पादचारी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेवून सुरू झालेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पूलासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, मात्र पूल पूर्ण होऊनही वाहतुकीसाठी संबंधित प्रशासन खुला करून देत नव्हते, त्यामुळे नावडे विभागातील भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर, प्रशांत खानावकर, नावडे फेज 2 अध्यक्ष मदन खानावकर, नावडे गाव अध्यक्ष भूपेश खानावकर, विशाल खानावकर, नितेश खानावकर, विजय खानावकर, महेश म्हात्रे आदी तरुणांनी बुधवारी (दि. 22) उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे.