Breaking News

उरणमध्ये समुद्रकिनारी स्फोटकसदृश्य वस्तू; परिसरात भीतीचे वातावरण

उरण ः वार्ताहर, बातमीदार

तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी गुरुवारी (दि. 12) स्फोटकसदृश्य वस्तू समुद्रकिनारी आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस समुद्रकिनारी दाखल झाले. दरम्यान, दोन कांड्यांचा स्फोट झाल्याने किनार्‍यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. समुद्रकिनारी शोध घेतला असता परिसरात 23 स्फोटक कांड्या आढळून आल्या आहेत. या वेळी, मोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी माणकेश्वर किनार्‍याची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या स्फोटक कांड्यांमुळे नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले मात्र या स्फोटक कांड्या जहाजांवर धोक्याची सूचना देण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते यांनी सांगितले आहे. पोलिसांनी याबाबत नागरिकांना शांतता राखून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक पोलीस व ओएनजीसी कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साध्या फ्लेअर्स आहेत. मोठी जहाजे आपत्कालीन परिस्थितीत सिग्नल देण्यासाठी या काड्यांचा वापर केला जातो, असे सांगण्यात आले आहे. या फ्लेअर्स बोटीतून त्यांची ट्रान्सफर करताना किंवा कचर्‍याचे ट्रान्सफर करताना समुद्रात पडू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

आपल्या परिसरात कोणतेही स्फोटकसदृश्य सामान किंवा इतर कोणतेही घातक पदार्थ आढळून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे. कोणताही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल, तर त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply