Breaking News

सावित्रीतील उत्खननाने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत धोक्यात

सावित्री नदीपात्रातील राजेवाडी ते केंबुर्ली क्षेत्रात पर्यटन व नौकानयन क्षेत्र सुरू करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने सावित्री नदीपात्रात ड्रेझरद्वारे उत्खनन करण्यात येणार आहे मात्र असे झाल्यास सव ते राजेवाडी या आठ किलोमीटर पट्ट्यातील परिसरातील हजारो एकर भातशेती भविष्यात नष्ट होऊन नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विहिरी व बोअरवेल नष्ट होण्याची शक्यता असल्याने पर्यटनाच्या नावाखाली नौकानयन हे कोणाच्या फायद्याचे? असा सवाल सव ते राजेवाडी पट्ट्यातील स्थानिक शेतकर्‍यांनी प्रशासनाला केला आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाने काढलेल्या 5 मे 2022 च्या परिपत्रकानुसार महाड तालुक्यातील सावित्री नदी, बाणकोट खाडी व महाडजवळील राजेवाडी ते केंबुर्ली या सागरी विनियम क्षेत्रातील नौकानयनाचा विकास व्हावा यासाठी नवीन नौकानयन मार्गाची आवश्यकता असल्यास केवळ नौकानयन मार्ग जलद गतीने व्हावा या उद्देशाने ड्रेझरने यांत्रिक पद्धतीने उत्खनन करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक 5 मे 2022 रोजी रायगड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

सावित्री नदीपात्रातील बाणकोट खाडीसह महाडजवळील वाळू उपशासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांना शासनाने सागरी मंडळाकडून प्राधिकृत केले असून पुढील कार्यवाही त्यांनी सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत, मात्र या निर्णयामुळे सव ते राजेवाडी पट्ट्यातील सुमारे 8 किलोमीटर परिसरातील हजारो एकर भातशेतीत ड्रेझरद्वारे उत्खनन झाल्याने रसायनमिश्रित खाडीचे पाणी शिरून भातशेती नष्ट होईल व पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतदेखील प्रदूषित होतील. एकंदरीत सव ते राजेवाडी पट्ट्यातील ड्रेझर उत्खननामुळे रहिवाशी क्षेत्रातील नागरिकांनादेखील याचा मोठा फटका बसणार आहे. सव ते राजवाडी अंदाजे आठ किलोमीटर अंतर असून नौकानयन जलवाहतूक करण्यासाठी नदी किंवा खाडीची खोली 30 मीटर खोल असणे जरुरीचे आहे, तसेच नौकानयन क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रातून नौकानयन होते त्या ठिकाणी पुलाची उंची त्या क्षेत्रात नदीची खोली जलवाहतूक करणार्‍या बोटीची उंची याबाबतचे परिमाण कोण ठरविणार? असा प्रश्न पुढे आला आहे.

सव ते राजेवाडी जलवाहतूक करावयाची असल्यास सव ते राजेवाडीमध्ये कोणत्याही ठिकाणी व्यवसायिक बाजारपेठ नाही, तसेच जलवाहतुकीपेक्षा या दोन्ही क्षेत्रांमधील गावांना रस्तामार्गे वाहतूक करणे सोयीचे ठरत आहे. सव ते राजेवाडी जलवाहतूक करावयाची असल्यास कोणत्या ठिकाणी जेट्टी उभी करायची आणि जेट्टी उभारण्यासाठी व जेट्टीपर्यंत जाणारा रस्ता यासाठी लागणारी जमीन संपादित करावी लागणार आहे. याकरिता लागणारी जमीन प्रत्येक ठिकाणी खासगी मालकीची आहे, त्याबाबत शासनाचे धोरण काय आहे याचा निर्वाळा करण्यात आलेला नाही. सव ते राजेवाडी जलवाहतूक फायद्या पेक्षा तोट्याची असून न परवडणार्‍या मार्गावर कोणती कंपनी आपली जलवाहतूक चालविणार? असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. सव ते राजेवाडीपर्यंत जलवाहतूक करताना महाडजवळील दादली पुलाची उंची, पुलाचे गाळे व जलवाहतूक करणार्‍या बोटीची लांबी रुंदी उंची याचा प्रशासनाला विसर पडलेला दिसतो.

सव ते राजेवाडीपर्यंत जलवाहतूक करताना शेडाव नाक्यावर गोड्या पाण्याचा डोह आहे. त्या डोहातून महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना तसेच महाड शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात या डोहातून पाणीपुरवठा टँकरद्वारे केला जातो. जर जलवाहतूक करावयाची झाल्यास राजेवाडीजवळील शेडाव दोहामधील गोडे पाणी सावित्री खाडीमधील भरतीच्या वेळी येणार्‍या खार्‍या व रसायनमिश्रीत पाण्यामुळे प्रदूषित होईल. त्यामुळे जल वाहतुकीमुळे महाड शहर शेडाव नाक्यावरील गोड्या पाण्याच्या डोहाला कायमस्वरूपी मुकावे लागेल. सव-राजेवाडी या मार्गावर रस्त्याने येताना शिरगाव फाट्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी कार्यरत आहे, मात्र जलवाहतूक करावयाची झाल्यास या मार्गावर सागरी सुरक्षा योजनेबाबत काय या सागरी सुरक्षितेच्या बाबतीत सागरी पोलीस ठाणे निर्मितीबरोबरच गस्ती नौकांद्वारे 24 तास देखरेख ठेवावी लागेल. याचा खर्च कोण करणार? यामुळे शासनाने काढलेले हे परिपत्रक एकंदरीत हास्यास्पद आहे.

सव ते केंबुर्ली महाड गट अ मध्ये 2,76,440 घनमीटर म्हणजे 97,682 ब्रास वाळू तर केंबुर्ली ते महाड गट ब मधून 1,51,375 घनमीटर 53,490 ब्रास, महाड ते राजेवाडी गट क मधून 5,26,955 घनमीटर म्हणजे 1,86,203 ब्रास इतके उत्खनन केले जाणार आहे. यातून शासनाला अंदाजे 20 कोटी रुपये मिळणार आहे. यामुळे केवळ अल्पशा उत्पन्नासाठी ड्रेझरद्वारे केले जाणारे उत्खनन शेतकर्‍यांच्या शेतीवर घाला घालणारे आहे. यामुळे शासनाने काढलेले हे परिपत्रक पूरनियंत्रण करण्यासाठी आहे की, गाळ उपसा करणार्‍या ठेकेदारांसाठी आहे? असा प्रश्न महाडकर नागरिक करीत आहेत.

-महेश शिंदे, खबरबात

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply