महाड ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी महाड शहरानजीक सीमा गार्डन हॉटेलसमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही कारमधील एकूण पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक सीमा गार्डन हॉटेलसमोर रविवारी (दि. 15) दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई बाजूकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार (क्र. एमएच 04 जीयु 6609) व गोवा दिशेला जाणारी एक्स युवी (क्र. एमएच 01 डीटी 6654) ही एका वाहनाला ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेने येऊन आपटली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रवींद्र पंढरीनाथ तावडे (61), मनाली रवींद्र तावडे (25) दोन्ही रा. उमर खाडे मुंबई, समीर शशिकांत कदम (41) कळवा ठाणे, नलिनी बाबा ठाकूर (50) भांडुप, विहान समीर कदम (5) कळवा ठाणे असे पाच प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती महाड महामार्ग वाहतूक पोलीस शाखा यांना मिळताच पोलीस हवालदार मंदार लहाने आणि पोलीस शिपाई झेपले यांनी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.