Breaking News

काँग्रेस जोडो यात्रा

देशभरातील पराभवांच्या मालिकेनंतर काँग्रेसने पक्षीय ढांचामध्ये बदल करायचे ठरवले आहे. तरुणांसाठी 50 टक्के प्रतिनिधित्व तसेच एक कुटुंब, एक तिकिट अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या घोषणेचे नक्कीच स्वागत करता आले असते. परंतु गांधी परिवाराचे संरक्षण करण्यासाठी त्यातही पळवाटा ठेवण्यास हा पक्ष विसरलेला नाही. सलग पाच वर्षे पक्षामध्ये सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यासच उमेदवारी देण्याचे काँग्रेसने ठरवले असले तरी या घोषणा केवळ शाब्दिक बुडबुडे ठरतील हे सर्वांना माहीत आहे.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आणि स्वतंत्र भारतावर दशकानुदशके राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या इतकी करुण झालेली आहे की देदिप्यमान इतिहास असलेला हाच तो पक्ष आहे का, असे कोणी नवखा विचारेल. गेल्या आठ वर्षांमध्ये काँग्रेसची प्रचंड पडझड झाली. निवडणुकीच्या मैदानातील हार-जीत हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या वाटचालीतील एक भाग असतो. सत्ता येते आणि जाते, परंतु सत्तेशिवाय देखील जो पक्ष धीराने जनतेसाठी सर्वस्व पणाला लावतो, त्याला असल्या हार-जीतींचे विशेष काही वाटत नाही. एकेकाळी अवघे दोन सदस्य संसदेपर्यंत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते कुत्सितपणे हसत असत. त्याच भाजपचा आज विशाल वटवृक्ष झालेला आहे आणि त्याची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. काँग्रेस पक्ष मात्र समूळ उच्चाटनाच्या मार्गावर आहे. इतके होऊनही या पक्षामध्ये सुधारणेची काही शक्यता दिसत नाही. हरवलेले नेतृत्व आणि विखुरलेले कार्यकर्ते अशी या पक्षाची स्थिती आहे. आपल्या पक्षात नवसंजीवनी फुंकण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी राजस्थानातील उदयपूर येथे तीन दिवसांचे नवसंकल्प शिबिर आयोजित केले होते. राजकीय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, आर्थिक, संघटनात्मक बाबी, शेतकरी आणि कृषी, युवक आणि रोजगार अशा विषयांवर येथे चर्चा झाली असे समजते. विविध दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली यासाठी सहा समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समित्यांनी आपले विस्तृत अहवाल श्रीमती गांधी यांच्याकडे सुपुर्द केले. या अहवालातील सूचना आणि प्रस्तावांच्या आधारे नवसंकल्प शिबिराच्या समारोपाला घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले. ऐंशी वर्षांपूर्वी 1942 साली महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीला भारत छोडो असे फर्मावले होते, त्यातून देशभरात स्वातंत्र्यलढा उभारला गेला. 2022 मध्ये देशाची घोषणा भारत जोडो हीच आहे आणि हाच उदयपूरचा नवसंकल्प असल्याचे या घोषणापत्रात म्हटले आहे. सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारून निवडणुकींच्या रिंगणात उतरावे असा विचार शिबिरामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांनी मांडला. त्यावर शिबिरात बरीच चर्चा झाली असे समजते. आपला पक्ष जनतेपासून तुटला आहे, तो पुन्हा जोडण्यासाठी घाम गाळावा लागेल असा सल्ला खासदार राहुल गांधी यांनी शिबिरार्थी नेते मंडळींना दिला. त्यांच्या या विधानात तथ्य असले तरी पक्षाच्या वाट्याला हे तुटलेपण का आले याचा विचार राहुल गांधी यांनीच करायला हवा. त्यांच्याच असमंजस, अविवेकी आणि अपरिपक्व राजकारणामुळे काँग्रेसवर ही अवकळा आली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंतीपासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढण्याचा संकल्प शिबिरामध्ये सोडण्यात आला. साडेतीन हजार किमीची ही काँग्रेसी पदयात्रा कशी पार पडणार हाच मोठा प्रश्न आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply