Breaking News

माथेरान पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला सहा जणांच्या हरकती

कर्जत : बातमीदार

एक जानेवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या 20 जागांसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आरखडा जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यांनी जाहीर केला आहे. या प्रारूप आराखड्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या संभाव्य आरक्षणास हरकती घेण्यात आल्या आहेत.

माथेरान गिरिस्थान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून 27 टक्के ओबीसी आरक्षणाच्या जागा या सर्वसाधारण गटामध्ये समाविष्ट करून प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर करणे, त्या आराखड्यास हरकती, सूचना आक्षेप घेणे, त्या हरकतींवर जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणी घेणे, कोकण विभागीय आयुक्तांकडून प्रारूप प्रभाग रचना आरखडा अंतिम करणे आणि अनुसूचित जाती-जमाती यांचे आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना आरखडा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाने सध्या राबविला जात आहे.

माथेरान नगर परिषदेसाठी लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या तीन जागा वाढल्या असून आता 20 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 10 प्रभागात प्रत्येकी दोन जागा असे दहा प्रभागातून 20 सदस्य निवडले जाणार आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन 20 पैकी 16 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत, तर अनुसूचित जातीसाठी तीन आणि अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव असणार आहे. या 20 जागांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण आहे.

रायगड जिल्हाधिकार्‍यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून अधिकार दिलेल्या माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी प्रारूप प्रभाग रचना आरखडा 10 मे रोजी प्रसिद्ध केला होता. त्या आराखड्यास हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी 14 मेपर्यंत कालावधी होता. या कालावधीत मुख्याधिकार्‍यांच्या कार्यालयात प्रभाग सातमधील अनुसूचित जमाती आरक्षणास माथेरानमधील सहा जणांनी आक्षेप घेतला आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांसमोर 23मे रोजी या हरकतींवर  सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 6 जून रोजी कोकण विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचना अंतिम करणार आहेत. तर 7 जून रोजी अंतिम प्रभाग रचना प्रारूप आरखडा प्रसिद्ध केला जाणार आहे.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. आलेल्या हरकती आणि आक्षेपांची सुनावणी 23 मे रोजी रायगडचे जिल्हाधिकारी घेणार आहेत.

-सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान गिरिस्थान नगर परिषद

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply