Breaking News

फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना सुरू

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील  वन्यजीव मोजणीस सोमवारी (दि. 16) सुरुवात करण्यात आली. अभयारण्यातील प्रत्येक प्राण्याची मोजणी व नोंद एका वहीत करण्यात येणार असून हा रेकॉर्ड काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

फणसाड अभयारण्यामध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीवांची मोजणी केली जाते.त्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून पाणस्थळांच्या ठिकाणी  काठ्यांची मचान बनवण्यात आली आहेत. अभयारण्यातील प्रत्येक प्राण्याची मोजणी व नोंद वहीत करण्यात येणार असून हा रेकॉर्ड काही दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

भारतातील बहुतांशी अभयारण्ये तथा राष्ट्रीय उद्याने राजे-महाराजे व संस्थानिकांच्या शिकारीच्या हौसेखातर राखून ठेवलेल्या क्षेत्रापैकी आहेत. अशाच प्रकारे पूर्वीचे केसोलीचे जंगल हे नबाब सिद्दींचे राखीव शिकार क्षेत्र म्हणजेच आजचे फणसाड अभयारण्य होय. त्याला 1986 साली शासनाने अधिसूचित केले. सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या फणसाड अभयारण्यात बिबटे, रानगवे, ससा, डुक्कर, कोल्हे, हरीण, रानमांजर, सांबर, पिसोरी, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, मोठीखार अर्थात शेकरु आदींचा वावर आढळतो. तर सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सापाच्या जाती आढळतात.

सोमवारी या अभयारण्यातील वन्यजीव मोजणीस प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी अभयारण्य प्रशासनाकडून पाणस्थळांच्या ठिकाणी काठ्यांचे मचान बनवण्यात आले आहेत. वनरक्षक व वनमजूरांचे गट पाडण्यात आले असून, त्यांना त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे या कामासाठी काही संस्थांचीसुध्दा मदत घेतली आहे. या अभयारण्यात अनेक पाण्याची स्त्रोत आहेत त्या ठिकाणी जागता पहारा देऊन वनकर्मचारी वन्यजीवांची संख्या मोजणार आहेत. पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम या घनदाट जंगलात राहणार आहे.

फणसाड अभयारण्य क्षेत्रात 15 ठिकाणी मचान बांधण्यात आलेल्या आहेत. जिथे वन्यजीव पाणी पिण्यासाठी येतात तिथे आमचे कर्मचारी त्यांची गणना करणार आहेत. काही खाजगी सस्थांचे सदस्यसुध्दा या कामात मदत करणार आहेत. वन्यजीव गणनेसाठी प्रशानाने संपूर्ण तयारी केली असून सर्व कर्मचारी आपल्या नियुक्त जागी पहारा करीत आहेत.

-राजवर्धन भोसले, वनपरीक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य, ता. मुरूड

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply