कर्जत : बातमीदार
नेरळ रेल्वे स्टेशन परिसरातील निवासी संकुलात पिसाळलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. त्यापैकी एका माकडाला मंगळवारी (दि. 17) बदलापूर येथील प्राणीमित्रांनी सापळा लावून पकडले. त्याला खोपोली येथील जंगलात सोडण्यात आले.
नेरळ येथील तुलसी निवासी संकुलात गेल्या काही महिन्यांपासून फासेपारध्यांनी सोडलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. पिसाळलेली ती माकडे प्रत्येक घरात जाऊन शिजवलेले अन्न तसेच खाद्यपदार्थावर ताव मारायची तर लहान मुलांच्या हातातील वस्तू पळवून नेत होती. त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयात लेखी तक्रारी केल्या होत्या. तर 50हुन अधिक नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली समस्या मांडली होती. त्यानंतर वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांनी बदलापूर येथील प्राणीमित्रांना नेरळ येथे पाचारण केले. बदलापूर रेस्क्यू टीमचे सदस्य मनोहर मेहेर, परेश पानसरे व मनीष फुलपगारे यांनी नेरळ येथे येवून पाहणी केली. त्यानंतर बदलापूर रेस्क्यू टीमने सापळा लावून मंगळवारी एका माकडाला पकडले. त्या वेळी नेरळचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम, वनपाल सुहास म्हात्रे, वनरक्षक भूषण साळुंखे, मनोज बारगजे, वनमजूर ज्ञानेश्वर माळी यांनी बदलापूर रेस्क्यू टीमला सहकार्य केेले.
पकडलेल्या माकडाला वन विभागाच्या कर्मचार्यांनी खोपोली येथील जंगलात सोडून दिले. तर दुसर्या माकडाला पकडण्यासाठी पुन्हा एकदा सापाळा लावण्यात येणार आहे, अशी माहिती प्राणीमित्र मनोहर मेहेर यांनी दिली.