मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप; चोख बंदोबस्त
रायगड ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी रायगड जिल्ह्यात असणार्या पाली व महड येथे गुरुवारी (दि. 19) संकष्ट चतुर्थीनिमित्त महड येथे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. पाली येथील श्री बल्लाळेश्वर व महड येथील श्री वरदविनायक ही दोन गणतीची स्थळे अष्टविनायकांपैकी महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याने येथे कायमच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. त्यात सध्या सुट्टीचा हंगाम व गुरुवारी संकष्ट चतुर्थी असल्याने भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे खालापूर तालुक्यातील महड येथे श्री वरदविनायक मंदिरातही पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरातील गाभार्याला आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. महड गणपती संस्थानतर्फे अध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व मंदिराबाहेर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कुठे भक्तांना त्रास होणार नाही यासाठी व्यवस्थापक बडगुजर हे जातीने लक्ष ठेऊन होते.