बदलापूरच्या वाहनात आढळल्या दारुच्या बाटल्या
कर्जत : बातमीदार – कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे गुरुवारी (दि. 7) दोन रिक्षांमध्ये अपघात झाला. या अपघातात कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाला धडक देणार्या दुसर्या रिक्षात दारूच्या 16 बाटल्या आढळल्या. यावरून संबंधित रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडून नेले आहे.
कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे कर्जतकडे जाणार्या रिक्षाला कल्याणकडे जाणार्या रिक्षाने जोरदार धडक दिली. बदलापूर येथील रिक्षाचालक आपली एमएच 05-डीझेड 5102 ही रिक्षा घेऊन कर्जतवरून कल्याण रस्त्याने बदलापूरकडे निघाला होती. त्या वेळी या रिक्षामध्ये चालक आणि दोन असे तिघे होते आणि नेरळ पेट्रोल पंप येथे ज्या वेळी त्या रिक्षाने एमएच-46 बीडी 3023 या क्रमांकाच्या रिक्षाला धडक दिली, त्या वेळी हातात दारूच्या बाटल्या घेऊन दोन तरुण पळून गेले, असे रिक्षाची धडक बसलेल्या कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जयवंत बाळू पवार याने सांगितले.
या अपघातात कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जयवंत पवार यांना मोठी जखम झाली असून, त्यांचा पाय मोडला आहे. नेरळ पोलिसांनी या रिक्षाचालकास रायगड हॉस्पिटलमध्ये पाठवले, तर बेजबाबदारपणे रिक्षा चालवणार्या बदलापूर येथील रिक्षाचालकास पकडून पोलीस ठाण्यात नेले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.