पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते, पण या कठीण काळातही आरोग्य कार्मचार्यांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवत अनेक जणांचे जीव वाचवले. अशा या कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि गौरव करण्याकरिता शनिवारी (दि. 21) आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्या हस्ते 50हून अधिक कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. नवीन पनवेल आदई सर्कलजवळील आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने शनिवारी कोविड योद्ध्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले गेले होते. या समारंभास उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर तसेच डॉ. जयवंत शेलार, डॉ. समीर पाचपुते, डॉ. संकल्प राव, संतोष करगुटकर, धर्मवीर सिंग आदी उपस्थित होते. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आरोग्य कर्मचार्यांचा सत्कार करून पनवेल महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली तसेच आयटीएम सेंटरच्या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता दुसर्यांचा जीव वाचवणार्या आरोग्य कर्मचार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.