पर्यटकांचा वाढता ओघ पाहून रेल्वे विभागाचा दिलासा
कर्जत ः बातमीदार
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू असून या पर्यटन हंगामात माथेरानमधील थंडगार हवामान अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी असलेल्या मिनीट्रेनच्या शटलसेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक शलभ गोयल यांनी माथेरान-अमन लॉज शटल सेवेच्या फेर्या वाढविल्या आहेत. नेरळ-माथेरान-नेरळ या 21 किलोमीटर लांबीच्या मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गावर रूळ बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे सध्या फक्त माथेरान स्टेशन ते अमन लॉज स्टेशनदरम्यान शटलसेवा रेल्वेकडून चालविली जात आहे. मे आणि जून महिन्यातील दोन आठवडे माथेरानमध्ये पर्यटन हंगाम जोरात असतो. त्यामुळे मध्य रेल्वेकडून चालविण्यात येणार्या शटल सेवेच्या फेर्या वाढविण्याची मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेत मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी पुढील आठवड्यात शटलसेवेच्या फेर्या वाढविल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मिनीट्रेनच्या शटलसेवेच्या फेर्यांत वाढ झाली आहे. सोमवार ते शुक्रवार या काळात आठ फेर्या होणार असून शनिवार आणि रविवारी शटलसेवेच्या 10 फेर्या होणार आहेत. माथेरान शहरात जाण्यासाठी मिनीट्रेनची सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटक खुश आहेत.
-असे आहे वेळापत्रक
माथेरान ते अमन लॉज – सकाळी 8.15, 9.30, 10.20, 11.25, दुपारी 12.20, 1.35, 2.40, 3.30, 4.20 आणि सायं.5.10
अमन लॉज ते माथेरान – सकाळी 8.40, 9.55, 11.55, दुपारी 12.45, 2, 3.5, 3.55, 4.45, सायंकाळी 5.35