Breaking News

उघडलं तर मग बंद करता आलं पाहिजे…!

वरील वाक्य आहे मैत्रयी व्यसनमुक्ती केंद्र, नागपूरमध्ये गेल्या एक-दीड वर्षांपासून उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीसोबत बोलतांना ऐकलेले. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये क्षेत्रकार्य करत असतांना त्या व्यक्तीसोबत झालेली चर्चा माझ्यासाठी अनेक सकारात्मक विचार देऊन गेली आणि त्यांनी बोललेलं वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळेच व्यसनमुक्तीसाठी हा लेखप्रपंच..

समाजामध्ये व्यसनामुळे किती तरी घर-कुटुंब उध्वस्त झालेली तुम्ही-आम्ही बघत असतो. कारण सवय म्हणून घेतलेल्या एखाद्या गोष्टीचे व्यसनामध्ये रूपांतर कसे होते हे कळत सुद्धा नाही. कारण सुरुवातीला फक्त आवड म्हणून त्या वस्तूकडे बघितले जाते पण हळूहळू त्याची सवय व्हायला लागते आणि एकदा काय सवय जळली की मग ते व्यसन होऊन जाते. खरंतर कोणतेही व्यसन हे घातक असते. व्यसन मग वस्तूचे असो की माणसाचे त्यातून होणारे दुष्परिणाम हे वाईटच असतात….

बर्‍याचदा मित्र-मंडळींच्या सानिध्यात असतांना मित्र घेतो म्हणून  काहीजण मित्राच्या आग्रहास्तव दोन घोट घेतो, पुढे दोनाचे चार होतात, चाराचे आठ, आठचे सोळा आणि खर्‍या अर्थाने इथेच लागतो मग आयुष्याला घोडा. कारण समोरच्याकडून उघडणे शिकलेले असते पण बंद कसे केले जाते हे माहीतच नसते. त्यामुळे घोटभर घेतलेली एखादी वस्तूची सवय पोटभर पर्यत कधी जाते हे समजत सुद्धा नाही आणि व्यसनामुळे माणूस माणसात सुद्धा राहत नाही…

घोटभर ही पोटभर झाली नाही पाहिजे याची प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बाटलीचे झाकण उघडण्याची सवय लागताच त्याला बंद करायला सुद्धा शिकले पाहिजे. कारण एखाद्या गोष्टीची सवय लावणे फार सोपे असते पण खरा दम लागतो तो त्यापासून दूर होण्यासाठी. त्यामुळे ज्या सवयीचा परिणाम दीर्घकाळ भोगावा, सोसावा लागतो अशा सवयीपासून चार हात दूर राहिलेले बरे.. कारण एकदा काय व्यसन लिमिटच्या बाहेर करणे सुरू झाले तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात…

आज समाजात दारू अनेकजण पितात पण प्रत्येक पिणारा वाईट असतो वा त्याची दारू वाईट असते असे नाही. कारण किती प्यायची? कुठे प्यायची? कशी प्यायची? आणि कशासाठी प्यायची? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे असतात. पण व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसांचे तसे नसते. एकदा प्यायला बसला की मग तो बाटली संपेपर्यंत काही तिथून उठायचं नाव घेत नाही आणि पितांना त्यांना घरदार, परिवार कुणीही दिसत नाही. व्यसनामुळे आज कितीतरी घरदार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे कोणत्याही सवयी लावतांना चांगले-वाईट परिणामाचा विचार करा नंतरच त्याच्यामागे लागा…

तसे बघता व्यसन करण्यामागे मुळात काही कारण नसतेच. पण काही लोकांचे व्यसनाचे कारण ऐकल्यावर हसू येत? मला टेन्शन आहे म्हणून मी दारू पितो, व्यसन करतो? मला सांगा टेन्शन दारूमुळे दूर होत का? जर असे असेल तर घरातील प्रत्येक महिलांनी ते करावे का? कोणत्याही व्यसनी माणसाला आपल्या परिवारातील इतर कोणत्याही सदस्याने व्यसन केलेले आवडत नाही. का? कारण कोणतेही व्यसन वाईट असते आणि त्याचे परीणाम सुद्धा वाईट असतात हे त्याला चांगल्याने माहीत असते.

व्यसन करतांना व्यसनाधीन झालेल्याना भीती नसते परिणामाची. पण व्यसन करणार्‍या प्रत्येकांनी एकदा तरी नक्की विचार करा घरातील इज्जतीचा, आई-वडिलांच्या स्वप्नांचा, मित्रांच्या विश्वासाचा, बायकोच्या त्यागाचा, मुलाबाळांच्या भविष्याचा, समाजाचा बघण्याच्या दृष्टिकोनाचा. व्यसन करणारा व्यसन करून मोकळा होतो पण परिणाम भोगावे लागतात आई-वडील, बायको, मुलबाळ, मित्र परिवार, समाजाला. कारण व्यसनामुळे हळूहळू आयुष्यच पूर्णपणे अंधारात जायला लागते.

चौकट व्यसनापासून दूर राहा

मित्रांनो एकदा इज्जत गेली ना ती परत मिळविण्यासाठी पूर्ण आयुष्य निघून जाते पण ती इज्जत काही मिळत नाही. त्यामुळे सर्वात आधी कोणतेही व्यसन कुणीही लावू नये आणि ज्यांना लागले आहे त्यांनी शक्य असेल तेवढ्या लवकर बंद केले पाहिजे. कारण आयुष्य सुंदर आहे ते पुन्हा परत मिळत नाही. कालची गोष्ट एका मित्राच्या बाजूच्या घरचा 29 वर्षाचा एकुलता एक मुलगा अपघातात गेला कारण होत अपघात झाला तेव्हा तो दारू पिऊन होता. तो गेला, जातांना आई-वडिलांच्या हजारो स्वप्नांचा चुराळा केला. असे कितीतरी उदाहरणं आजूबाजूला आपण दररोज बघत असतो. त्यामुळे व्यसने सोडा, माणसांना जोडा आणि उघडलंच चुकीने एखाद्या वेळी तर त्याला आधी बंद करा..

-सुरज पि. दहागावकर,चंद्रपुर

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply