गॅस पाइपलाइन बाधित शेतकर्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
अलिबाग : प्रतिनिधी
रिलायन्स कंपनीच्या गॅस पाइपलाइन बाधित पेण तालुक्यातील शेतकर्यांनी नुकसान भरपाई मोबदला मिळावा, या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
रिलायन्स कंपनीकडून दहेज ते नागोठणे दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले होते. 2017 मध्ये करण्यात आलेल्या या कामासाठी शेतकर्यांच्या जमिनी उकरून त्यात पाइपलाइन टाकण्यात आली होती. या कामामुळे शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकर्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचे हमीपत्र लिहून देण्यात आले होते. मात्र कंपनीने काही शेतकर्यांना नुकसान भरपाई मोबदला दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनी दाद देत नसल्याने पेण तालुक्यातील शेतकर्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
रत्नदीप रघुनाथ घरत (रा. कळद), पद्माकर परश्या केवारी (रा. शेणे), जनार्दन नारायण घासे (रा. मुंडाणी) आणि सुदाम परशुराम पाटील (रा. बोरगाव) हे चार शेतकरी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. नुकसान भरपाई मोबदला मिळत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.