Breaking News

राहुलने ठोकला विक्रमांचा षटकार

लंडन ः वृत्तसंस्था

भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शानदार शतक झळकावले. भारताला मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वांत मोठे योगदान देणार्‍या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत. राहुलने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. सर्वाधिक शतके करणार्‍या भारतीयांच्या यादीमध्ये तो 24व्या स्थानी आहे. त्याने या शतकासह एम. एस. धोनी आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोघांनीही कसोटीमध्ये प्रत्येकी सहा शतके झळकावली आहेत. राहुलने सलामीवीर म्हणून मैदानात उतरताना रोहित शर्मासोबत 126 धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर तिसर्‍या विकेट्ससाठी त्याने विराट कोहलीच्या सोबतीने 117 धावा जोडल्या. कोणत्याही भारतीय खेळाडूने दोन शतकी भागीदार्‍या करण्याची ही लॉर्ड्सवरील पहिलीच वेळ ठरली. सलामीवीर म्हणून राहुलचे हे परदेशातील चौथे शतक आहे. आशियाबाहेरील देशांमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय सलामीवीर म्हणून राहुल दुसर्‍या स्थानी आहे. केवळ सुनील गावस्कर यांनीच सलामीवीर म्हणून राहुलपेक्षा अधिक शतके झळकावली आहेत. गावस्कर यांनी सलामीला फलंदाजी करताना 15 शतके केली आहेत. शतकासह राहुलने सर्वाधिक शतके झळकावणार्‍या भारतीय सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्मासोबत स्थान मिळवले आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकवणारा राहुल हा 10वा फलंदाज ठरलाय. दिलीप वेगसरकरांनी या मैदानावर सर्वाधिक म्हणजेच तीन शतक झळकावून ते येथे सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय ठरले आहेत. सौरभ गांगुली, राहुल द्रविड, अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकरनेही या मैदानात शतक झळकावले आहे. या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणारा राहुल हा तिसरा सलामीवीर आहे. या आधी वीनू मांकड आणि रवी शास्त्रींनी हा विक्रम केलाय. राहुलने आपल्या या शतकी खेळीमध्ये पहिला चौकार 108व्या चेंडूवर लगावला. त्याने आधीच्या 107 चेडूंमध्ये केवळ 22 धावा केल्या होत्या. त्यानंतर मोईन अलीच्या चेंडूवर षटकार लगावत सामन्यात पहिल्यांदाच चेंडू सीमेपार धाडला. तब्बल 35 वर्षांनी प्रथमच भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेरील कसोटी सामन्यात प्रत्येकी 75 धावांहून अधिक धावा केल्या. यापूर्वी 1986मध्ये सुनील गावस्कर (172) आणि कृष्णमाचारी श्रीकांत (116) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply