उरण : प्रतिनिधी
उरणच्या हितेश भोईरने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये वैयक्तिक तीन सुवर्ण पदकांची कमाई करून आपली छाप उमटवली आहे. हितेशच्या यशाबद्दल राज्यभरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. तिरुअनंतपुरम मास्टर्स गेम असोसिएशन, केरळ यांच्यावतीने तिरुअनंतपुरम येथे नुकताच चौथी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उरणमधील हितेश भोईर याने या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. स्पर्धेमधील वर्चस्व राखण्यासाठी आलेल्या सर्वच स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली होती, मात्र हितेशने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये 50 मी फ्रिस्टाईल, 100 मी फ्रिस्टाईल आणि 400 मी फ्रिस्टाईल या तीन जलतरण प्रकारांमध्ये वैयक्तिक तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर 4-50 मी फ्रिस्टाईल रिले आणि 4-50 मी मिडले रिले या दोन सांघिक जलतरण प्रकारांमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहे. हितेश भोईर हा उरणमधील नगरपालिकेच्या स्विमिंग पुलवर प्रशिक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांनी घडवलेल्या स्पर्धकांनी पनवेल येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. हितेशच्या यशाची बातमी कळताच त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.