पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाजे गाव येथील अर्पिता फार्म शेजारी एक जीवघेणा कुंडी धबधबा आहे. ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकार्याने हा धबधबा बुजविण्यात आला आहे.
कुंडी धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो, परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून या धबधब्यात उतरतात. पाण्याचा प्रचंड वेग व मोठ्या भोवर्यात ते अडकून राहिल्याने पाण्यात बुडून मयत होतात. दरवर्षी अनेक अल्पवयीन मुले व नवतरुण बुडून मृत्युमुखी पडत असत. यावर कायमचा प्रतिबंध व्हावा याकरिता पनवेल परिमंडळ 2चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील व पनवेल विभाग सहाय्यक आयुक्त भागवत सोनवणे व वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वाजे ग्रामपंचायत कमिटी, मंडळ अधिकारी अजित पवार व वन खात्याचे आरएफओ सोनवणे यांच्या मान्यतेने व उपस्थितीत कुंडी धबधब्यात ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठा 10 ते 15 फुटाचा खड्ड्यात पाण्याचा भवरा तयार होतो तो खड्डा पोकलेन मशिन व नियंत्रित ब्लास्टिंगच्या सहाय्याने संपूर्ण दगडांचा भराव करून कायमचा बुजविण्यात आलेला आहे.
यामुळे आता तेथे कोणतीही दुर्घटना होणार नाही. ही कामगिरी यशस्वी होण्यासाठी हवालदार ओंबासे, नाईक जयदीप पवार व शिपाई भोये यांनी विशेष मेहनत घेतली.