Breaking News

मासेमारीबंदी काळातील विश्रांतीसाठी उरण किनारी मच्छीमारी नौकांचा विसावा

उरण : वार्ताहर

जून महिन्यापासून खोल समुद्रातील मासेमारीला सरकारने बंदी घातली असल्यामुळे उरणचे किनारे मच्छीमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. मच्छीमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी शाकारून (नांगरून) ठेवल्या आहेत. उरण तालुक्यातील मोरा बंदर, करंजा बंदर, दिघोडे येथे हजारो नौका सध्या विसावा घेत आहेत. 1 जून ते 31 जूलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय चालतो.

जून-जूलै हा महिना माश्यांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा आणि या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे 1 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छीमार बांधवदेखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्यांच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. खरं तर दरवर्षी राज्यात 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जायची. पण इतर राज्यातली बंदी 1 ऑगस्टला उठवतात. त्यामुळे बाहेरचे मच्छीमार याठिकाणी येऊन व्यवसायाला सुरुवात करायचे. त्यामुळे इथल्या मच्छीमारांचं नुकसान व्हायचं. त्यामुळे देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातल्या बंदी कालावधीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून 1 जून ते 31 जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला आहे.

जीवावर उदार होऊन मासेमारी करून आपली उपजिवीका करणार्‍या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. 15 लाखाच्या वर कुटूंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकिय चलन मिळते. एकट्या महाराष्ट्रात जवळ जवळ 4लाख 68 हजार मेट्रीक टन मासळी पकडली जाते. उरण तालुक्यातदेखील मच्छीमारांची संख्या लक्षणीय आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक लोक खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करतात. देशाच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावणार्‍या या दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षीतांचे जीणे जगत असतो. शासनाने या कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. त्यातच परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण हा आत्ता महाराष्ट्राच्या मच्छिमारांसाठी मोठी समस्या झाली आहे.

 तालुक्यात नौकांची संख्या लक्षणीय

उरण तालुक्यातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, शेवा, नागाव, दिघोडे, आवरे, कोप्रोली, खोपटे, वशेणी आदी गावातील हजारो लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा या गावातील लोकांचे तर मासेमारीच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे उरण तालुक्यात मच्छीमार नौकांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व नौका सध्या मोरा, करंजा, दिघोडा या बंदरावर शाकारून ठेवल्या आहेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply