सहा मुलांना विहिरीत ढकलण्याच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित
महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यातील बिरवाडीजवळील खरवली गावाच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने महाडसह रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या महिलेने हे टोकाचे पाउल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी परिसरात सुरू असलेल्या प्राथमिक चर्चेतून आर्थिक विवंचना, कौटुंबिक कलह, क्षणाचा राग अशी विविध कारणे बोलली जात आहेत.
महाडमधील खरवली गावात घडलेल्या घटनेत सहा बालकांचा नाहक जीव गेला. या सहाही बालकांवर मंगळवारी (दि. 31) अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील तपास यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले हे कुटुंब वर्षभरापूर्वी महाड औद्योगिक परिसरातील शेलटोली गावात राहण्यास गेले होते. यापूर्वी हे कुटुंब खरवली येथे राहत होते. ज्या विहिरीत या मुलांना ढकलून देण्यात आले तिथून शेलटोली गावाचे अंतर जवळपास सहा किमीच्या वर आहे, मात्र खरवली गावात राहिल्याने विहीर आणि परिसराचा अंदाज या महिलेला असावा आणि यामुळेच ही महिला पूर्वी राहत असलेल्या खरवली गावातील विहिरीवर आपल्या पोटच्या मुलांना घेऊन आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विहिरीच्या मालकाने या महिलेला परतत असताना पहिल्याने हा प्रकार उघड झाला आहे. यामुळे विहीर मालकाची फिर्यादी म्हणून नोंद पोलिसांनी घेतली आहे. एक वर्षापूर्वी हे कुटुंब खरवली ढालकाठी येथे राहत होते, असे विहीर मालक महादेव शिर्के यांनी सांगितले.
दरम्यान, या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. सहा मुलांना एक महिला विहिरीत कशी काय ढकलून देऊ शकेल? एका मुलाला ढकलून दिल्यानंतर अन्य मुले का पळाली नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उकल होणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलांना ढकलून देणारी महिला रूना साहनी व तिचा पती चिखरू साहनी यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.