जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंब्यांचा बाजारपेठेत प्रभाव
पाली : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्ती व असंख्य आव्हाने पेलत जांभुळपाड्यातील संदेश पाटील यांच्या आंबा बागायतीमधील गावठी हापुस सातासमुद्रापार पोहचला आहे. अमेरिकेत हा गावठी हापुस भाव खात असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचा प्रभाव दिसून येत आहे. यावर्षी हवामान बदल व अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले. यावर्षी आंबा उशीरा बाजारात आला आहे, रत्नागिरी व देवगडचा आंबा संपत चालला आहे, त्यामुळे रायगडच्या आंब्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. गावठी हापुसला मोठी पसंती आहे. ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. कोकणातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकर्यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे. हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे. अमेरिकासारख्या राष्ट्रात कोकणातील गावठी हापुसला मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आलेत. यातून आंबा शेतकर्यांना अधिकचा नफा मिळू लागलाय, असे आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात आंबा बागांचे क्षेत्र 14 हजार हेक्टर इतके आहे. उत्पादनक्षम आंबा बागा या 12540 हेक्टर क्षेत्रावर आहेत. रायगड़ जिल्ह्यातील आंबा परदेशात निर्यात होत असल्याने उत्पादकांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
-दत्तात्रेय काळभोर, उपसंचालक, कृषी विभाग, अलिबाग-रायगड