Breaking News

सचिन वाझेचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला

अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ

मुंबई ः प्रतिनिधी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत. याबाबत सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे उद्या सीबीआयकडून 100 कोटी खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

100 कोटी खंडणी प्रकरणात सहआरोपी असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या कोठडीत आहेत. आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावे, असा अर्ज त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला होता. संबंधित अर्जाला आता न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत. संबंधित गुन्ह्यात सचिन वाझे हे सहआरोपी आहेत.

या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या वतीने संबंधित अर्जाला विरोध करण्यात आला, पण शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. एक आरोपी दुसर्‍या आरोपीच्या माफीचा साक्षीदार होण्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. या सुनावणीदरम्यान सचिन वाझे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या वेळी न्यायालयाने माफीचा साक्षीदार होण्याबाबतच्या सर्व अटी आणि शर्तीची कल्पना करून दिली. 7 जून रोजी माफीचा साक्षीदार होण्याच्या कागदपत्रांवर सचिन वाझे यांची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सुनावणीस सचिन वाझे यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply