परतीच्या पावसाच्या तडाख्याने बळीराजा हवालदिल
नागोठणे : प्रतिनिधी
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भातशेती भिजून शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हटले जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. खरीप हंगामातील पीक सध्या तयार झाले असून, 15 दिवसांपासून भाताच्या कापणीला नागोठणे परिसरात सुरुवातदेखील झाली आहे, मात्र यातील बहुतांश क्षेत्रावरील भात कापणीअंती शेतातच आहेे.
मागील चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेती झोपली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता शेतकर्यांमध्ये आहे. सद्यस्थितीत शेकडो टन भाताचे नुकसान झाले आहे व जो भात उरेल त्याचे दाणे कुजून काळे पडणार असल्याने त्यालाही किंमत येणार नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. पीक वाया गेल्याने शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करीत आहेत.
दरम्यान, नागोठणे परिसरात ज्यांच्या शेतात यापूर्वी भाताची कापणी झाली होती त्यांनी वाल व पावटा या कडधान्यांची पेरणी केली होती, मात्र पावसामुळे ही पेरणीही पावसात वाहून गेल्याने आता कडधान्यांची दुसर्यांदा पेरणी करावी लागणार असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले.