Breaking News

ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबवत्सल सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनुभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी समाजाला दिशा देणारी आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करीत गुरुवारी (दि. 2) सायंकाळी न्हावाखाडी येथे उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा हृद्य सत्कार करण्यात आला. निमित्त होते ते समाजसेवेचा अथांग सागर, दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांचे आधारवड असेलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71 वा वाढदिवस. भव्य शामियानात झालेल्या या सोहळ्याने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समाजाला ऊर्जा देणारा ठरला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेले माजी मंत्री विद्यमान आमदार लोकनेते गणेश नाईक, माजी मंत्री विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्यात केला. गरिबीतून मोठे झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर कधीच गरिबांना विसरले नाहीत. त्याचबरोबरीने समाजसेवेचा अखंड यज्ञ सुरूच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करताना मनोभावे व्यक्त केले. या वेळी या उपस्थित मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचे भव्य पुष्पहार देऊन अभीष्टचिंतन केले. व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, स्व. दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते दशरथ भगत, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासात ज्या थोर व महनीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली. त्या व्यक्तीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. आजही ते तळागाळात मदत करत असतात म्हणून त्यांची दानशूर कीर्ती देशभर आहे. आणि त्यांचा माणसावर जास्त विश्वास आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्हावा खाडी येथे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभीष्टचिंतन सोहळा, आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उलवा नोडसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण, तसेच महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत व नंदेश उमप निर्मित लोककलांतून महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजाला नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात. त्यामुळे सामाजिक भावना लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या सोहळ्यात होत असताना कुटुंबवत्सल वातावरण अधोरेखित होत होते. आजपर्यंत लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे त्यांनी सत्कार करून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर सन्मान केला आहे. त्या अनुषंगाने ही परंपरा कायम ठेवत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार महेश बालदी यांनी म्हंटले कि, लोकनेते यांचा वाढदिवस स्फूर्ती व ऊर्जा देणारा दिवस आणि त्याचे औचित्य साधून या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर या गावात जन्मले. मी या गावात जन्मलो, खेळलो वावरलो त्या गावात जे जे मला चांगले करता आले पाहिजे हि भावना ठेवून ते काम करीत आहेत. या परिसरात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामबाग उभारली आहे. महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण आपल्या गावाठिकाणी असे नंदनवन फुलवले नसेल. त्यामुळे हा परिसर आवर्जून पहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी बोलताना सांगितले कि, पत्रकारितेच्या 62 वर्षात मी खूप मोठ्या माणसांत वावरलो. पण माझ्या मनात मोजकी माणसे वसलेली आहेत त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर हे असून असा माणूस  कदापिही होणे नाही. समाजासाठी कण अन कण देणारे ते व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखा पुन्हा माणूस घडणार नाही. महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण रयत शिक्षण संस्थेला 7 कोटी रुपयांची इमारत देणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. विलासराव देशमुख नेहमी बोलायचे प्रत्येक जिल्ह्यात रामशेठ ठाकूर निर्माण झाले पाहिजे. समाजाची विचारधारा असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक जीवनात काम करताना कधीही पक्ष बघितला नाही, त्यामुळे त्यांना सर्व पक्षात आदराचे स्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्रचा इतिहास लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वगळून लिहू शकत नाही, असेही मधुकर भावे यांनी अधोरेखित केले.

या सन्मानाला उत्तर देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आजच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, रुग्णवाहिकेचे लोकार्पण अशा समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम माझ्या जन्मगावीच होत असल्याचा मला जास्त आनंद आहे. नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, परेश ठाकूर ही पिढी आज सक्षमपणे विकासाची कामे करीत आहे, हे बघून समाधान वाटते. मी लहान असतानाचे न्हावाखाडी आणि आता विकास झालेले न्हावाखाडी यात खूप फरक आहे आणि हा फरक मला करता आला, याबद्दल कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे.

या सोहळ्यात पंचक्रोशीच्यावतीने न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, चिंतामण भोईर, विजय घरत, सागर ठाकूर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले. या सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक, कला, राजकीय, कामगार, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने नागरिक, हितचिंतक उपस्थित होते.

गरिबीतून मोठे झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर गरिबांना विसरले नाहीत -आमदार गणेश नाईक

गरिबांच्या वेदना लोकनेते रामशेठ ठाकूर यांना माहित आहेत, त्यामुळे ते गरिबाला कधीही विसरले नाहीत. 1996-97 साली आम्हा दोघांचा परिचय झाला. संजीव नाईक यांचे ते शिक्षक होते, त्यामुळे रामशेठ आणि संजीव यांच्यात गुरु-शिष्याचे नाते आहे. रामशेठ यांना अनेक आमिषे आली पण ते तत्व पाळणारे  आहेत, त्यामुळे ते कधीही त्या आमिषांना बळी पडले नाहीत. रामशेठ यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर विनम्र व सजग असे आहेत, ते सुद्धा त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून समाजाच्या उत्कर्षाचे काम करीत आहेत. कोणतेही कार्य करताना ते जात धर्म पंथ बघत नाहीत म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे, तसेच रामशेठ यांचा सन्मान म्हणजेच समाजाचा सन्मान आहे. जुन्या आठवणींचा वेध घेताना त्यांनी सांगितले कि, मी शिवसेनेमध्ये असताना दि. बा. पाटील साहेब शेकापत होते आणि त्यावेळी रायगडमध्ये शिवसेना रुजावी हि शेकापची धारणा नव्हती त्यामुळे दि. बा. पाटील आणि माझ्यामध्ये थोडेबहुत मतभेद झाले होते मात्र आता नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देताना अनेकदा मी नसल्याचा उल्लेख होतो संजीव नाईक या लढ्यात आहे याचा अर्थ मी सुद्धा या लढ्यात आहे, ज्यावेळी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल त्यावेळी या लढ्यात ताकदीनिशी उतरीन.

…आणि समाजमंदिर उभे राहिले -आमदार रवीशेठ पाटील

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला ठाकूर यांना संपत्तीचा, मोठेपणाचा गर्व नाही. न्हावा खाडी गावात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने हिर्‍याने जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या अफाट कार्यातून सर्व समाजाला आधार दिला. समाजासाठी देणारी लोकं फार कमी असतात पण रामशेठ ठाकूर त्याला अपवाद ठरले. आपल्याकडे आहे ते सढळ हस्ते देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. 1990 सालापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी पेण परिसरात समाजमंदिर उभारण्याचा समाजातील लोकांचा प्रयत्न होता, मात्र त्यावेळी पैसा गोळा होत नव्हता, मदत जमा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि एक दिवस रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. पाच पंचवीस हजार मदतीच्या आशेने शब्द टाकला, मात्र रामशेठ यांनी त्यावेळी तब्बल तीन लाख रुपयांची देणगी दिली. 32 वर्षांपूर्वी रामशेठ ठाकूर यांनी ती देणगी दिली नसती तो समजांदिर उभे राहिले नसते.

खराची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे दानशूरपणा आहेच पण त्या बरोबरीने लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे ते नेते आहेत. प्रेमाने लोकांची मने जिंकणारे ते आहेत. कंदिलाला असलेल्या काचेचे महत्व नसते तर त्यात असलेली ज्योत महत्वाची असते त्याप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर समाजाची ज्योत असून त्याचा प्रकाश रायगडमध्ये पसरले आहे.

-दशरथ पाटील, अध्यक्ष, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समिती

रामशेठ ठाकूर खर्‍या अर्थाने सर्व क्षेत्रात यशस्वी आहेत. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी दिलेले योगदान महत्वाचे आणि अतुलनीय आहे. रामशेठ यांना नाही म्हणता येत नाही.

-माजी मंत्री जगन्नाथ पाटील

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply