लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये भव्य उलवे सायक्लोथॉन 2022 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारपर्यंत 700हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. त्या अनुषंगाने सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा महिला व पुरुष प्रकारात आणि 25 किमी, 15 किमी, 10 किमी व तीन किमी अंतर अशा चार गटांत होणार असून विजेत्यांना भरघोस पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. विशेष आकर्षण असलेल्या 25 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्यास 20 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 10 हजार रुपये, तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये, चतुर्थ व पाचव्या क्रमांकास अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार रुपये तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभाग घेणार्या स्पर्धकास टी-शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी झुम्बा मनोरंजनाचा लाभ प्रेक्षक व स्पर्धकांना घेता येणार आहे. याशिवाय तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोसायट्यांसाठी विशेष स्पर्धाही होणार आहेत. यामध्ये स्वच्छ सोसायटी, स्पर्धेत सर्वांत जास्त सहभाग आणि ग्रीन सोसायटी यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 10 हजार, तीन हजार व दोन हजार रुपये असे बक्षीस असणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ऑफलाईन, तर www.rtisc.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी 9029065533 किंवा 9820198381 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.