पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात रायगड जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल कोकण विभागात उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्यातर्फे (ता.5) गौरविण्यात आले.
पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये राबविणेत येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी या अभियानात नोंदणी करून सहभाग नोंदविला होता.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा नरीमन पाईट येथे झाला. या वेळी कोकण विभागात उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.