Breaking News

जिल्हा परिषदकडून नेहमी निधी अडविण्याचे काम

वैकुंठ पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप

पेण : प्रतिनिधी

आमदार रविशेठ पाटील यांनी विकासकामांसाठी आणलेला निधी अडविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राजिपचे माजी  विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील यांनी बुधवारी (दि. 8)पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की रस्त्यासाठी कोणातच निधी दिला नसल्याचा आरोप शेकापचे जि. प. सदस्य प्रभाकर म्हात्रे यांनी काही दिवसापूर्वी केला होता. त्याचा समाचार वैकुंठ पाटील यांनी या पत्रकार परिषदेत घेतला. या विकासकामाबाबत आपल्याकडे पुरावा प्राप्त झाला असल्याचे सांगून वैकुंठ पाटील यांनी  कार्यकारी अभियंता (जि.प.) यांनी दिलेल्या पत्राची प्रत या वेळी सादर केली. एप्रिल महिन्यापासून सुरु होणारे रस्त्याचे काम अडवून तेथील जनतेला खड्ड्यातून प्रवास करायला लावण्याचे पातक जिल्हा परिषद सदस्यानेच केले असल्याचा आरोप वैकुंठ पाटील यांनी या वेळी केला.

रायगड जिल्हा परिषदेत अनेक वर्षापासून शेकापची सत्ता असूनसुद्धा प्रभाकर म्हात्रे यांनी वाशी विभागातील या भागाचा विकास केला नाही. आमदार रविशेठ पाटील यांच्याच माध्यमातून या भागात रस्त्यांसह इतर विकासकामे होत आहेत. मात्र या कामांसाठी रविशेठ पाटील यांनी दिलेला आमदार निधी अडविण्याचे काम कोणी केले, हे प्रभाकर म्हात्रे यांनी जनतेला सांगावे, असे वैकुंठ पाटील म्हणाले.

आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास घेतला असल्याने आमदार निधीतून वडखळ, बोरी, शिर्की, मसद येथील रस्त्यांवर 10 लाखांच्या प्रमाणे चार टप्यात 40 लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे येथील विकासात्मक कामे होत आहेत.  शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते आमदार निधीतून चकाचक झाले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारे काही रस्ते आजही दुरावस्थेत असून त्याकडे लक्ष देण्यासाठी जिप सदस्यांना वेळ नाही, असा टोला वैकुंठ पाटील यांनी या वेळी लगावला. 

पेण तालुक्यातील वडखळ, शिर्की, वाशी, वढाव, भाल यासह पुर्व विभागातीलही रस्त्यांसाठी आमदार पाटील यांनी या अगोदर कोट्यावधी रुपयांचा निधी देवून अनेक विकासकामे केली आहेत. वडखळ विभागातील रस्त्यांसाठी आमदार रविशेठ पाटील यांनी डीपीडीसी अंतर्गत पत्रव्यवहार करून त्याला तदर्थ मान्यतासुद्धा  मिळवून दिली आहे. मात्र मंजूर कामाचा निधी अडविण्याचा काम तेे लोक करीत आहेत. मागच्या अनेक वर्षापासून जिप सदस्य म्हणून काम करूनसुध्दा  सभापती पद न मिळाल्याने नैराश्यापोटी प्रभाकर म्हात्रे बेताल वक्तव्य करीत असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply