मुंबई ः प्रतिनिधी
महावितरणच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त भांडूप परिमंडलातील विविध मंडळ कार्यालयातर्फे कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भांडूप परिमंडळ व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोंकण प्रादेशिक विभागाचे, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर, भांडूप परिमंडळाच्या अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) शुभांगी कटकधोंड, ठाणे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलतांना कोंकण प्रादेशिक विभागाचे, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे म्हणाले की, मला महावितरणच्या प्रत्येक कर्मचार्यांवर अभिमान आहे. आपल्या घरी दिवाळी साजरी करीत नाही मात्र संपूर्ण शहराला अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी तत्पर असतो. मुख्य अभियंता धनंजय औढेंकर म्हणाले की, चक्रीवादळात महावितरणने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कोरोनाच्या काळात महावितरणच्या कित्येक अधिकारी व कर्मचार्यांनी आपले प्राण गमवले आहेत. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्व योद्धांना सलाम करतो. कार्यक्रमाची सुरुवात महावितरण कंपनी कशी काम करते व महावितरणने केलेल्या कारगिरीबद्दल चित्रफीत दाखविली. त्यानंतर, प्रसिद्ध विदुषक राजा यांनी जादूचे अदभूत प्रयोग दाखवून मुलांसोबत सर्वांचे मनोरंजन केले. याशिवाय प्रेम करावं पण जपून या नाटकाचे प्रस्तुतीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ठाणे मंडळाचे कार्यकारी अभियंते सुनील माने, जीवन चव्हाण, नितीन थिटे, सुरेश सवाईराम, अनिलकुमार पाटील, दत्ता भणगे, इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांनी मेहनत घेतली.