पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेत सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन महिन्यांत 22 कोटी 937 रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात मार्चपर्यंत 108 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला होता. महापालिकेला वर्षाला 210 कोटी रुपये मालमत्ता कर जमा होणे अपेक्षित आहे.
पनवेल महापालिका हद्दीत तीन लाख 39 हजार मालमत्ताधारक आहे. त्यापैकी दोन लाख 50 हजार निवासी मालमत्ताधारक आहेत. त्यांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरल्यास त्यांना कुटुंब अपघाती विमा योजनेचे संरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील एक किंवा जास्त व्यक्तींच्या नावावर मालमत्ता असणे आवश्यक आहे. पनवेल महापालिकेमार्फत मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध ई-सुविधा देण्यात आल्या आहेत. क्युआर कोडबरोबरच पीएमसी टॅक्स अॅप मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे.
महापालिकेने मालमत्ताधारकांना त्यांनी 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत कर भरल्यास 100 टक्के दंड माफ करण्याची सवलत दिली होती. या सवलतीचा 1940 मालमत्ताधारकांनी फायदा घेतला असून त्यांनी 22 कोटी 937 लाख मालमत्ता कर भरला आहे. 31 जुलैपर्यंत 75 टक्के दंड माफ असल्याने या सवलतीचा जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी फायदा घेऊन कराचा भरणा करण्याचे आवाहन उपायुक्त गणेश शेट्ये यांनी केले आहे
पनवेल महापालिकेत सैन्यात काम केलेल्या मालमत्ताधारकांना महापालिकेच्या एकूण 38 टक्के करापैकी 20 टक्के असलेल्या सामान्य करात आठ टक्के सूट दिली जाते. नवीन पनवेलमधील प्रजापती सोसायटीतील नेव्हीतून निवृत्त झालेले वृद्ध गृहस्थ उपायुक्त गणेश शेट्ये यांच्याकडे आपले ओळखपत्र घेऊन आले होते. उपायुक्तांनी त्यांची कागदपत्रे स्वतः पूर्ण करून संबंधित क्लार्कला बोलावून यांनी आपल्या देशाची सेवा केली आहे. त्यांचे काम ताबडतोब करा सांगितले. त्यामुळे ते खुश झाले.
मालमत्ता कर शास्ति फी माफी पुढीलप्रमाणे
- 1.4.2022 ते 31.5.2022 ः 100%
- 1.6.2022 ते 31.7.2022 ः 75%
- 1.8.2022 ते 30.9.2022 ः 50%
- 1.10.2022 ते 31 12.2022 ः 25%