Breaking News

संकटकाळातली कामगिरी

कोविड महासाथीच्या संकटकाळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली. कोविडची तिसरी लाट, अपुरे राहिलेले अभ्यासक्रम, बहुतांशी ऑनलाइन पार पडलेले शिक्षण, त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष शाळा-कॉलेजातील शिक्षणाशी जुळवून घेणे या सार्‍यातून विद्यार्थ्यांची भीषण दमछाक झाली होती. मुंबईमध्ये कोविडसंबंधी परिस्थिती अधिकच बिकट होती. ती सावरायला सर्वाधिक वेळही लागला. त्यामुळे मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला असावा का असा प्रश्न कुणाला पडल्यास त्यात वावगे काही नाही. गेल्या काही वर्षांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवणार्‍यांमध्ये मुलींचाच समावेश अधिक असतो हे सातत्याने दिसून आले आहे. यंदाच्या बारावीच्या निकालातही हेच चित्र दिसते आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांमध्ये मुलींनी घेतलेली आघाडी हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकालदेखील लागला होता. तेव्हाही मुलींचेच यश डोळ्यात भरणारे होते. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात अपेक्षेप्रमाणेच निकाल लागले असले तरी यंदा दोन गोष्टी विशेषत: लक्षात घेण्याजोग्या आहेत. पहिली म्हणजे मुलींनी घेतलेली आघाडी आणि दुसरी मुंबई विभागाचा सर्वात कमी लागलेला निकाल. यापैकी पहिली गोष्ट स्वागतार्ह तर दुसरी चिंतेत टाकणारी आहे. यंदाची बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. राज्यातील सुमारे 14 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मागील वर्षी म्हणजे 2021मध्ये दीर्घ काळ विद्यार्थी-पालकांचा अंत पाहणार्‍या अनिश्चिततेनंतर दहावी-बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या व त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापन तसेच नववी ते अकरावीच्या गुणांच्या आधारे विशिष्ट सूत्र तयार करून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर 2022च्या बोर्डाच्या परीक्षांबाबतही काही काळ संभ्रमाचे वातावरण होतेच. या सार्‍या परिस्थितीतही हुशार विद्यार्थी एकाग्रचित्ताने परीक्षेची तयारी करू शकत असले तरी सामान्य कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मात्र ही अग्निपरीक्षाच होती. त्यात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे धोरण सर्वच बाबतीत सतत तळ्यात-मळ्यात करणारे. शिक्षणाच्या आघाडीवर तर त्यांनी संपूर्ण कोविड संकटकाळात भलताच गोंधळ घातला. प्रत्येक गोष्टीकरिता केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेवर विसंबून राहणे एवढीच कामगिरी त्यांनी पार पाडली. अर्थातच या सार्‍याचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाला असावा. सर्व प्रकारचा ताण, दबाव सोसूनही मेहनतीने उत्तम कामगिरी करण्याची क्षमता मुलींमध्ये दिसून येते असा सूर गेली काही वर्षे शिक्षणक्षेत्राशी संबंधित तज्ज्ञमंडळी लावत आहेत. मुळात मुलींवर अभ्यासाखेरीज इतर कामांचा ताण असतो. त्यामुळे वेळ वाया न घालवता जबाबदारीने अभ्यास करण्याची सवय त्यांना लागते. मुलींना शिक्षणाकरिता प्रोत्साहन देणार्‍या केंद्र सरकारच्या बचत योजनांचाही समाजमनावर अप्रत्यक्ष परिणाम हळूहळू होतो आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत पालक सकारात्मक होत चालले आहेत. या सार्‍याच्या परिणामातूनच प्रत्येक स्तरावरील परीक्षेत मुलींनी बाजी मारल्याचे दिसते आहे. बारावीच्या परीक्षेनंतर कारकीर्दीच्या दिशेने घेतल्या जाणार्‍या शिक्षणाची सुरूवात होते. खरे विश्व विद्यार्थ्यांसाठी खुले होते. या पुढील वाटचालीसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि ज्यांना अपेक्षित यश मिळाले नसेल त्यांनाही नव्या उमेदीने तयारी करण्यासाठी शुभेच्छा.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply