Breaking News

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी; 10 जागांसाठी 13 उमेदवारांमध्ये लढत

मुंबई ः प्रतिनिधी

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याची मुदत 13 जून आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 13 अर्ज दाखल झाले आहेत. भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक पाच उमेदवार दिले आहेत. भाजपकडे हक्काची 113 मते आहेत. त्यामुळे 27 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या 22 मतांची बेगमी करावी लागणार आहे, तर काँग्रेसची 44 मते असून 27 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसर्‍या उमेदवाराला 10 मतांची गरज भासणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना पुन्हा संधी दिली आहे, तर माजी मंत्री राम शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय असे एकूण पाच उमेदवार दिले आहेत. याशिवाय भाजपचे सहयोगी पक्ष आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजपचे पाच आणि सहयोगी पक्षाचे एक असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे विरोधक शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे, तर त्यांच्या जोडीला अनुभवी असे एकनाथ खडसे विधान परिषदेत पाठविण्यात आले. ’सेफ साईड’ म्हणून शिवाजीराव गर्जे यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

सदाभाऊ खोत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार

सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. भाजपमधील चर्चित नावांना मागे सारत सदाभाऊंनी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊंच्या नावाची घोषणा सहावे उमेदवार म्हणून केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply