Thursday , March 23 2023
Breaking News

बारणे आणि जगताप यांचे अखेर मनोमीलन

महायुतीमध्ये उत्साह; पार्थ पवारांना धक्का

पिंपरी : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांचे अखेर मनोमीलन झाले आहे. या दोघांची सोमवारी (दि. 8) पिंपरीत संयुक्त पत्रकार परिषदेस उपस्थिती लाभली. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले; तर महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत भर पडली आहे.

बारणे आणि जगताप हे दोघे तगडे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीला या दोघांचे पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपची युती झाली. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळची जागा शिवसेनेकडेच राहिली. बारणे यांनाच पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळाली. यानंतर बारणे यांनी पुढाकार घेत जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली होती. शिवसेना नेते संजय राऊत, उपनेत्या नीलम गोर्‍हे यांनीही जगताप यांची भेट घेतली होती. या दिलजमाईसाठी शिवसेनेचे राज्य संघटक आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनीदेखील पुढाकार घेतला होता.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप जगताप यांना सांगितला. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. रविवारी पुन्हा महाजन, बारणे आणि जगताप यांच्यात एकत्रित बैठक झाली. त्यानंतर सोमवारी दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन समेट झाल्याचे सांगितले.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply