नवी मुंबई : प्रतिनिधी
नेरूळ सेक्टर 17मधील जिम्मी टॉवर 1 इमारतीत स्लॅब कोसळून सात जण जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी (दि. 11) घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले.
जिम्मी टॉवर 1 या आठ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील 601 क्रमांकाच्या फ्लॅटच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी पावणे एक वाजता काम चालू असलेल्या फ्लॅटचा स्लॅब दुरुस्तीवेळी अचानक कोसळला. या वेळी सहाव्या मजल्यापासून तळापर्यंत स्लॅब कोसळत गेल्याने या दुर्घटनेत सात जण जखमी झाले. यामध्ये निशा धर्माणी (वय 48), रिया धर्माणी (2), सोनाली गोडबोले (29), अदित्यराज गोडबोले (15), सौमित्र गोडबोले (50), ललिता त्यागराजन (80), सुब्रमण्यम त्यागराजन (84) यांचा समावेश आहे. यातील चार किरकोळ जखमी असून तीन गंभीर जखमींवर नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई मनपाच्या अग्निशमन दलातील चार गाड्या, आपत्कालीन मदत पथक घटनास्थळी तातडीने येऊन त्यांनी बचावकार्य सुरू केले. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, भाजप महामंत्री विजय घाटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन येथील नागरिकांना मदतकार्यात सहकार्य केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …