Breaking News

शेडवर डांबर टाकताना कामगाराचा मृत्यू

सिस्टीमिटीक वायर कंपनी व्यवस्थापनाविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील ढेकू गावामधील सिस्टीमिटीक वायर प्रा. लि या कंपनीच्या पत्र्याच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी चढलेल्या रफीक नवाज खान (वय 40, मूळ रा.जालना) या कामगाराचा पंचवीस फुटावरून खाली पडून रविवार (दि. 12) सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी कामगाराच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात हालगर्जीपणा केला असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालापूर तालुक्यातील साजगांव ग्रामपंचायत हद्दीतील ढेकू गावात लोखंडी वायर तयार करणारा सिस्टीमिटीक वायर नावाचा कारखाना आहे. या कारखान्याच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी रफीक नवाज खान चढला होता. या दरम्यान पत्रा फुटल्याने डांबराच्या बादलीसह रफीक पंचवीस फुटावरून खाली पडला. कंपनी व्यवस्थापकांनी त्याला तातडीने खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणले तेथे डॉक्टरांनी रफीक खान याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती कळताच खोपोली पोलीस ठाण्याचे सहय्यक निरीक्षक हरेष कळसेकर घटनास्थळी पोहले. त्यांनी प्राथमिक तपास करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. दरम्यान, भरपाई दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास मृताच्या नातेवाईकांनी नकार दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मध्यस्थी करीत मृताच्या कुटूंबाला प्राथमिक तीन लाखाची मदत मिळवू दिली.

या प्रकरणी कंपनी व्यवस्थापक आणि ठेकादाराविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक हरेष कळसेकर करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply