अलिबाग : रामप्रहर वृत्त
अलिबागच्या कलाकारांनी संपूर्णतः अलिबागमध्येच बनवलेला आषाढ हा पूर्ण लांबीचा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येऊ घातला आहे. मनिष अनसुरकर निर्मित, लिखीत व दिग्दर्शित आषाढ या चित्रपटाचा ट्रेलर, आषाढी एकादशी निमित्त विविध समाज माध्यमांवर प्रदर्शित होत आहे. अलिबाग परिसरातील चौल, नागावसारख्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत केलेला आषाढ हा चित्रपट पंढरपूरच्या वारीची आगळी वेगळी कथा मांडतो.
वारी, विठ्ठलभक्ती, त्याकाळची नष्ट होऊ घातलेली खोत परंपरा, कोकणी लोकांचा देवभोळेपणा, प्रेमळ, माणसांतील नातेबंध आणि अखेर देव की दैव या प्रश्नावर गुंफलेले मनोवेधक कथानक म्हणजे आषाढ हा चित्रपट ! सध्या हा चित्रपट विविध नामांकित चित्रपट महोत्सव आयोजकांकडून निमंत्रित होत आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यानंतर मग हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यास योग्य त्या माध्यमाद्वारे प्रदर्शित होईल असे या चित्रपटाचे छायाचित्रकार संदीप वाटवे यांनी सांगितले.
आषाढ या चित्रपटास रूढार्थाने कोणीही निर्माता नाही. अलिबागमधील नामांकित अनुभवी कलाकार, आणि तंत्रज्ञ हेच सर्व या कलाकृतीचे निर्माते आहेत. मयुरी स्वामी, ज्योती राऊळ, सागर नार्वेकर, श्रद्धा पोखरणकर, आनंद पाटील, चंद्रशेखर लिमये, विश्वास तांबोळी, वसुंधरा पोखरणकर, प्रकाश कवळे, गौरांगी पाटील आदी कलावंतांच्या अभिनयाने सजलेल्या आषाढ चित्रपटाची निर्मिती एक्स्प्रिंमेंटल मुव्हीज या निर्मिती संस्थेतर्गत संदीप वाटवे फोटो अँड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.
कर्तव्य मोकल यांचे संकलन. संदीप वाटवे, सिद्धांत पाटील यांचे उत्कृष्ट छायाचित्रण, शुभम म्हात्रे याचे सेटडिजाईन, हिमालय चोरघे निर्मिती सूत्रधार, सुनील म्हात्रे यांचे पार्श्वसंगीत व ध्वनी संयोजन, श्रद्धा पोखरणकर यांची पटकथा, सहदिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा व पटकथा-संवाद सूचित पाटील, मेधा जोशी, विश्वास तांबोळी यांनी लिहिले आहेत.
संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत तुकाराम आदी संतश्रेष्ठांच्या अभंगरचना मनिष अनसुरकर यांनी संगीतबद्ध केल्या असून, त्या प्रज्ञा अभंगे, सागर नार्वेकर, विशाल अभंगे, महेंद्र पाटील यांनी गायल्या आहेत.
सुशांत नाईक, मयुरेश सवतीरकर सहाय्यक छाया चित्रण, आणि मयूर शिंदे, शुभम पानपाटील, कुणाल तिर्लोटकर, राहुल अवचार यांची प्रकाश योजना, अमित पाटील निर्मिती व्यवस्थापन तर सुजित पाटील, प्रसाद लोध, नम्रता भगत, ऋतिक जैन, मयुरेश काबाले, संजय काबाले (चौल) यांनी निर्मिती सहाय्यक म्हणून काम केले आहे.