Breaking News

प्राधान्य कशाला हवे?

जमेल त्या मार्गाने सत्ता मिळवणे सोपे असते. सतराशे-साठ उठाठेवी करून ती काही काळ टिकवतादेखील येते. परंतु रयतेच्या भल्यासाठी सत्ता राबवणे हे मात्र येरागबाळ्याचे काम नोव्हे, याचे प्रत्यंतर बुधवारच्या दिवसभरात महाराष्ट्राच्या जनतेला आलेच असेल. पाण्यावाचून तडफडणार्‍या जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याचवेळी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वार्‍यावर सोडून थेट अयोध्येत पोहोचून आपली बेगडी हिंदुत्वाची पोळी भाजण्यात मग्न होते. जालना जिल्ह्यातील रहिवासी पाण्यावाचून काय हाल भोगत आहेत याकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी जलआक्रोश मोर्चा काढला. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या मोर्चाचे नेतृत्व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. राज्यातील जनतेच्या अशा प्रश्नांकडे पाठ फिरवून याचवेळी अयोध्या दौरा करण्याची गरज शिवसेनेच्या नेत्यांना का पडली असावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची घोषणा महिनाभरापूर्वीच झाली होती. प्रजेला वार्‍यावर सोडून आपल्या दर्शनाला यावे असे प्रजाहितदक्ष श्रीप्रभू रामचंद्रांनी त्यांना नक्कीच सांगितले नसणार. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची तयारीही मोठी वाजतगाजत करण्यात आली आणि या दौर्‍याला मोठ्या प्रमाणात अवास्तव प्रसिद्धीही देण्यात आली. वास्तविक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणात पुन्हा सक्रिय होताना मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला, त्याचवेळी आपण 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. काही कारणास्तव त्यांचा हा दौरा होऊ शकला नाही. परंतु भोंग्यांच्या प्रश्नी त्यांना उदंड प्रतिसाद मात्र लाभला. भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सामील झालेल्या व सत्तेसाठी हिंदुत्वावर देखील तुळशीपत्र ठेवणार्‍या शिवसेनेला मात्र यानंतर आपला पारंपरिक मतदार गमावण्याची भीती वाटू लागली. अडीच वर्षांच्या सत्ता काळात प्रजेच्या हिताचा एकही निर्णय शिवसेना आणि महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष घेऊ शकले नाहीत. तेलही गेले आणि तूपही गेले अशीच ही अवस्था. शेवटी आपल्या कथित हिंदुत्वाचा उदो उदो करण्यासाठी शिवसेना नेत्यांना अयोध्या गाठण्यावाचून पर्याय उरला नाही. अयोध्येत देखील शिवसेनेच्या नेत्यांचे कसे स्वागत झाले हे बघण्याजोगे होते. नेत्यांनी वाजतगाजत निघायचे आणि अगोदरच पुढे पाठवलेल्या वर्‍हाडकर्‍यांनी त्यांचे स्वागत करायचे म्हणजे वरातही आपलीच, घोडेही आपलेच आणि बँडबाजाही आपलाच. अशातला प्रकार होता. भाजपसोबत असताना शिवसेना नेत्यांची केवढी तरी बडदास्त ठेवली जायची. त्यांच्या स्वागताला उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते आवर्जून उपस्थित राहात. आता स्वत:चीच टिमकी वाजवून घेण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही हे ओघाने आलेच. निव्वळ देखावा यापलीकडे शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौर्‍याला कसलेही महत्त्व देता येणार नाही. कारण गेल्या अडीच वर्षांत या पक्षाने आपली जवळपास सर्वच पुण्याई सत्तेच्या लोभापायी गमावली आहे. या ऐवजी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या अर्धाडझन मंत्री-आमदारांनी मराठवाड्यात जाऊन तहानलेल्यांचे अश्रू पुसले असते तरी पुष्कळ झाले असते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply