Breaking News

नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

दिवाळीनंतर नवी मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी 352 दिवसांवर गेला होता. तो कमी झाला असून आता 265 दिवसांवर आला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करीत पालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांत वाढ केली आहे.

दिवाळीपूर्वी शहरात करोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा 11 नोव्हेंबरला 352 दिवसांवर होता. त्यानंतर दिवाळीत नागरिक बिनधास्त घराबाहेर पडले. त्यामुळे दिवसाला नवीन करोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा तीन अंकांवर आली आहे. 61 नवे रुग्ण भाऊबीजेच्या दिवशी सापडले होते. परंतु त्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. सरासरी ही संख्या 150 पर्यंत येऊन पोहचली आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचा नवी मुंबई शहरात शिरकाव झाला. मे महिन्यात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा 11 दिवसांवरून फक्त सहा दिवसांवर खाली आला होता. दिवाळीपूर्वी शहरातील नवे रुग्ण कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला होता. परंतु नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे व आता करोना गेला या गैरसमजुतीमुळे पुन्हा शहरात गर्दी वाढली. नियमांचे पालन झाले नाही, त्यामुळे करोना रुग्ण वाढत आहेत.

दिवाळीनंतर बाधितांमध्ये वाढ

दिवाळीनंतर वाढत असणारी कोरोना रुग्णांची संख्या सोमवारीही कायम राहिली. शहरात 174 नवे रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण 47,249 कोरोनाबधित झाले असून मृतांची संख्याही 961 इतकी झाली आहे. दिवाळीअगोदर शहरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला शंभरच्या खाली रुग्णसंख्या गेली होती. मात्र दिवाळीनंतर यात वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. सोमवारी शहरात 174 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 44,872 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या नवी मुंबईत एक हजार 416 उपचाराधीन रुग्ण आहेत.

रेल्वे स्थानक परिसरात चाचणी केंद्रे

रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणी केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे. सोमवारपासून वाशी, नेरुळ व बेलापूर रेल्वे स्थानक परिसरांत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पहिल्या दिवशी साडेतीनशे प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सिडकोने वाशी, बेलापूर व नेरुळ स्थानकात पहिल्या टप्प्यात परवानगी दिल्यानंतर पालिकेने या ठिकाणी सोमवारपासून चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.

कोरोनाचे रुग्ण कमी झाले म्हणजे करोना संपला असे नाही. नागरिकांनी सतर्कता बाळगून सामाजिक अंतराच्या नियमावलींचे पालन केले पाहिजे. करोनावर लस उपलब्ध होईपर्यंत प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेत पालिकेला सहकार्य करावे. शहरात रुग्ण दुपटीचा दर हा कमी झाला म्हणजे धोका वाढला आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

एपीएमसीतही निर्बंध

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

एपीएमसीतून यापूर्वी शहरात वाढलेला कोरोना संसर्गाचा पूर्वानुभव पाहता महापालिका प्रशासनाने येथील पाचही बाजारांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बाजारात चाचणी केंद्र उपलब्ध करून दिले असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला आहे. पाचही बाजार समितीत कोरोना चाचणी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. या ठिकाणी 24  तास कारवाई करण्यासाठी भरारी पथकांत वाढ करण्यात येणार आहे. बाजार घटकांवर शिस्त लागावी यासाठी एपीएमसी प्रशासनालाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. कोणत्याही व्यापार्‍यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक वसुलीबरोबरच कायदेशीर कारवाई करून एक दिवसाकरिता त्यांचे गाळे सील करण्याचे आदेशही एपीएमसी सचिव यांना दिले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply