Breaking News

मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर

मुंबई ः प्रतिनिधी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरू असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदान केंद्रे होती, तर 2009मध्ये  एकूण 83 हजार 986 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014मध्ये एकूण 91 हजार 329 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात 55 हजार 814, तर शहरी भागात 39 हजार 659 मतदान केंद्रे असतील. मतदारांची नोंदणी सुरू असल्याने या मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोहचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदान केंद्रांची संवेदनशीलता बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 8 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हीलचेअरवरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

1950 हेल्पलाइनची 30 मदत केंद्रे कार्यरत

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 30 मदत केंद्रे कार्यरत करण्यात आली असल्याने मतदारांना कधीही सहज माहिती मिळण्यास मदत होत आहे. 1950 या हेल्पलाइनवर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरू असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply