युरो चषक स्पर्धा
सेव्हिल (स्पेन) ः वृत्तसंस्था
युरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेला स्पेनविरुद्ध स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्यामधील एका निर्णायक गोलच्या अपेक्षेने सामन्यात पहिल्या हाफनंतर एक तर दुसर्या हाफनंतर पाच मिनिटे वाढवून देण्यात आली. तरीही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्पेनने स्वीडनच्या गोलपोस्टवर अनेकदा गोल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र स्वीडनचा शक्तीशाली बचाव त्यांना तोडता आला नाही.
स्पेन आणि स्वीडनची तुलना केल्यास स्वीडनपेक्षा स्पेनचा संघ खूपच सरस होता, मात्र रॉबील ओल्सेन, ग्रीरार्ड मोरीनो आणि अल्वोरो मोराता यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी गमावल्याने संघाला एकही गोल करता आला नाही. स्वीडननेही स्पेनला एकीकडे गोल करून दिले नाहीत. दुसरीकडे त्यांनाही स्वत:साठी गोलच्या संधी निर्माण केल्या होत्या. अॅलेक्झॅण्डर इसाकने मारलेला एक अप्रतिम पास मार्कस बर्जकडे गेला, मात्र त्याला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले सर्जिओ बसक्युटस आणि बचाव फळीतील डिआगो लॉरेन्टी हे स्पेनचे मुख्य खेळाडू आहेत. त्यांना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत आयसोलेशनमध्ये रहावे लागले होते. त्यामुळे या दोघांना एकत्र सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.
सामन्यातील निर्धारित 90 मिनिटांच्या खेळाबरोबरच 6 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देऊनही सामना गोलशून्य बरोबरीमध्ये सुटला. सामना बरोबरीत सुटला असला तरी या सामन्यात स्पेन विजयी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र बचाव फळीने केलेल्या कामगिरीच्या जोरावर स्पेनचे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात स्वीडनला यश आले.
स्पेन संघाचे व्यवस्थापक लुईस इनरीक यांनी संघाला कर्णधार सर्जीओ रामोसला दुखापतीचे कारण देत संघातून वगळण्याचा निर्णय घेतल्याने ते सामन्यापूर्वीच चर्चेत होते. लुईस यांनी रिअल माद्रिद संघासाठी खेळणार्या एकाही खेळाडूला अंतिम 24 जणांच्या संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे अनेक फुटबॉल चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.